पुढारी ऑनलाईन डेस्क : फ्रान्समधील हिंसाचाराचे सत्र सूरुच राहिले आहे. फ्रान्समधील रस्त्यावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंसाचारादरम्यान आत्तापर्यंत (France violence) १३०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फ्रान्सच्या नॅनटेरे येथे २५ जून राेजी पोलिसांच्या गोळीबारात किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला. यानंतर देशातील विविध हिंसाचार उसळला आहे. या घटनेनंतर फ्रान्समध्ये संतप्त आंदोलकांनी देशभरातील शाळा, टाऊन हॉल आणि पोलिस स्थानकांना लक्ष्य केले . यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ऑबेरविलियर्समधील राज्य परिवहन (RATP) बस डेपोच्या किमान १३ बसेस पेटवून देण्यात आल्या होत्या. फ्रान्समध्ये निर्माण झालेली ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ४५ हजार सुरक्षा कर्माचारी तैनात (France violence) करण्यात आले आहेत. मात्र येथील परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही.
फ्रान्समधील या हिंसाचारामुळे येथील राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. कारण ते हे संकंट अशावेळी निर्माण झाले आहे, जेव्हा त्यांना त्यांच्या दुसर्या जनादेशासह जनतेसमाेर जायचे होते. दरम्यान मॅक्रॉन यांचे संपूर्ण लक्ष आता, येथील दंगलीवर कोणत्याही प्रकारे नियंत्रण ठेवण्यावर आहे. दरम्यान फ्रान्समध्ये निर्माण झालेल्या अशांततेमुळे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा जर्मनदौरा देखील पुढे ढकलण्यात आला आहे.
पॅरिसच्या बाहेरील भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून शहरातील बस सेवा रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात आल्या आहेत. वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यानंतर १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पण तो न थांबल्याने त्याच्यावर पोलिसांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. वाहन चालवल्यानंतर काही वेळातच या तरुणाचा अपघात झाला. पोलिसांनी त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याने गोळी झाडली त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मृत मुलाच्या आईच्या आवाहनावर ६ हजारहून अधिक लोक नॅनटेरे येथील आंदोलनात सहभागी झाले होते.