Stock Market 
Latest

Stock Market Closing Bell | FY24 च्या अखेरच्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजार विक्रमी उच्चांकाजवळ, ‘हे’ ५ घटक ठरले महत्त्वाचे

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२४ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजीचा झंझावात दिसून आला. आज गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक विक्रमी उच्चांकाच्या जवळ गेले. जागतिक सकारात्मक संकेत आणि अमेरिकेचा महागाई दर जाहीर होण्यापूर्वी आज गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्सने तब्बल १,१०० अंकांची वाढ नोंदवली. तर निफ्टीने २२,४५० चा टप्पाा पार केला. त्यानंतर सेन्सेक्स ६५५ अंकांनी वाढून ७३,६५१ वर बंद झाला. तर निफ्टी २०३ अंकांच्या वाढीसह २२,३२६ वर स्थिरावला.

सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. ऑटो, हेल्थकेअर, पॉवर, कॅपिटल गुड्स प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. तर ऑईल आणि गॅस, बँक, रियल्टी एफएमसीजी प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वधारले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.३३ लाख कोटींची वाढ

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल गुरुवारी ३.३३ लाख कोटी रुपयांनी वाढले. तर २०२४ च्या आर्थिक वर्षात सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १२८.८ लाख कोटींनी वाढून ३८६.९७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

'बजाज'चे शेअर्स टॉप गेनर्स

बीएसई सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, एसबीआय, एम अँड एम, टाटा स्टील, नेस्ले इंडिया, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर रिलायन्स, ॲक्सिस बँक या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून आली.

दरम्यान, हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम आणि जेएसडब्ल्यू स्टील सारख्या हेवीवेट कंपन्यांच्या शेअर्समधील तेजीमुळे निफ्टी ५० निर्देशांक २२,४५० पातळीच्या वर गेला. ग्रासीम, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड हे शेअर्सही टॉप गेनर्स राहिले. तर श्रीराम फायनान्स, बजाज ऑटो, ॲक्सिस बँक, रिलायन्स या शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली.

गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित

गेल्या काही दिवसांतील अपेक्षेपेक्षा जास्त अमेरिकेतील महागाई दराच्या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीला विलंब झाला. यामुळे गुंतवणूकदारांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. पण या महिन्याच्या सुरुवातीला फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण बैठकीत फेडने घेतलेल्या भूमिकेमुळे ही चिंता कमी झाली. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. व्याजदर जैसे थे ठेवला आहे. तसेच आगामी काळात व्याजदरात तीन वेळा कपात करण्याचे संकेत फेड रिझर्व्हच्या अध्यक्षांनी दिले. आता बाजाराला जूनमध्ये व्याजदर कपातीची अपेक्षा आहे.पण शुक्रवारी महागाईची आकडेवारी त्यावर परिणाम करू शकतो, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जागतिक बाजारातून मजबूत संकेत

या आठवड्याच्या शेवटी महागाई दर जाहीर होण्यापूर्वी अमेरिकेच्या बाजारात बुधवारी तेजी राहिली होती. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज निर्देशांक १.२२ टक्क्यांनी वाढून बंद झाला. तर एस अँड पी ५०० निर्देशांक ०.८६ टक्क्यांनी वाढला. तर नॅस्डॅक कंपोझिट ०.५१ टक्क्यांनी वाढून बंद झाला. दरम्यान, आशियाई बाजारात आज संमिश्र वातावरण दिसून आले. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक सुमारे १ टक्क्यांनी तर शांघाय कंपोझिट १.२ टक्क्यांनी वाढला. पण जपानचा निक्केई २२५ निर्देशांक (Nikkei 225) १.४ टक्क्यांनी घसरला.

बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्समध्ये वाढ

बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्समध्ये आज वाढ दिसून आली. आरबीआयने पर्यायी गुंतवणूक निधी (AIFs) मध्ये कर्जदात्यांना गुंतवणुकीसाठी अलीकडेच कडक केलेले नियम शिथिल केल्यानंतर फायनान्सियल क्षेत्रातील शेअर्स वधारले आहेत. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स प्रत्येकी ४ टक्क्यांपर्यंत वाढले. बजाज हाऊसिंग फायनान्सने संभाव्य इनिशिअल पब्लिक ऑफरिंगबद्दल (IPO) अनेक गुंतवणूक बँकांशी प्राथमिक टप्प्यावर बोलणी सुरू केल्याच्या वृत्तानंतर हे शेअर्स वाढले. बीएसई सेन्सेक्सवर एसबीआयचा शेअर्स २ टक्क्यांहून अधिक वाढला. तसेच निफ्टी बँक आणि निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक सुमारे १ टक्क्यानी वाढले.

परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढला

भारतीय बाजारात पुन्हा परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढला. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी बुधवारी २,१७० कोटी रुपये किमतीच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी १,१९८ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. महागाईत झालेली घट, जूनमध्ये व्याजदर कपातीची शक्यता आदीमुळे भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदार परतले आहेत. देशांतर्गत शेअर्सची उच्च कामगिरी आणि मजबूत आर्थिक उलाढाल यामुळे परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात होत असलेली गुंतवणूक वाढली आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT