Latest

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांचे निधन

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. राम गोविंद ताकवले यांचा जन्म हुरगुडे( जि. पुणे) येथे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळे त्यांचे काही शालेय शिक्षण पुणे जिल्ह्यातील खेडे गावात झाले. त्यांच्या वडिलांची पुण्याला पदोन्नतीवर बदली झाल्यामुळे पुणे येथे शालेय शिक्षण पूर्ण करून ते फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले.

तेथून बी.एस्सी. १९५६ साली आणि पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. १९५७ साली प्राप्त करताना त्यांनी भौतिकशास्त्र आणि सैद्धान्तिक भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात आणि पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्राचे अध्यापन केले. मॉस्को विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. संपादन केली.

पुणे विद्यापीठातील अध्यापनानंतर ते इ.स. १९७८-१९८४ आणि इ.स. १९८८-१९८९ या वर्षी पुणे विद्यापीठात कुलगुरूपदी होते. इ.स. १९८५ ते १९८७ या वर्षांत त्यांनी राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. इ.स. १९८९-१९९५ या कालावधीत त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळली, तसेच इ.स.१९९५-१९९८ या कालावधीत ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू होते.

डॉ. ताकवले यांनी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील कारकिर्दीनंतर माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून दूरशिक्षणाची पद्धत विकसित करण्याचे काम सुरू केले. इ.स.२००१ ते २००४ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे संचालक म्हणून काम केले. महाविद्यालयांचे मूल्यमापन करून श्रेणी देणाऱ्या नॅशनल असेसमेन्ट आणि अ‍ॅक्रेडिटेशन काऊन्सिलचे (नॅक) अध्यक्षपद त्यांनी इ.स.२००३ ते २००६ असे तीन वर्षे भूषवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT