गणेश खळदकर
पुणे : कुलगुरू या सर्वोच्च पदावर गुणवत्ताधारक व्यक्ती विराजमान व्हावा. शिवाय त्यांची निवड पारदर्शकपणे व्हावी, अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कमी गुणवत्ता असणार्या उमेदवारांची वर्णी लावण्यासाठी दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात 1 हजारांहून अधिक संलग्न महाविद्यालये आहेत. या विद्यापीठाला नॅकनेही सर्वोच्च दर्जा बहाल केलेला आहे. त्यामुळे कुलगुरुपदी कुणाची वर्णी लागणार, याबद्दल उत्सुकता शिगेला लागली आहे. कुलगुरुपदासाठी 18 व 19 मे रोजी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पाच उमेदवारांची नावे अंतिम मुलाखतीसाठी निश्चित केली आहेत.
राज्यपाल रमेश बैस हे 26 मे रोजी मुलाखती घेणार आहेत. या स्पर्धेत विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, रसायनशास्त्र विभागाचे प्रा. अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागातील डॉ. संजय ढोले, पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रा. सुरेश गोसावी आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी हे पाच जण आहेत. राजकीय दबावापोटी कमी गुणवत्ता असलेल्या उमेदवाराच्या गळ्यात कुलगुरुपदाची माळ पडणार असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
पुणे विद्यापीठ हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले विद्यापीठ आहे. त्यामुळे कुलगुरुपदासाठीचा उमेदवार हा विद्यापीठातील असावा. त्याची नियुक्ती गुणवत्तेच्या आधारेच व्हावी. प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचार्यांची त्यांना चांगली माहिती असावी. त्या व्यक्तीकडे 20 टक्के लीडरशीप, 20 टक्के मॅनेजमेंट आणि 60 टक्के प्रशासन असे 100 टक्के ज्ञान असलेल्या व्यक्तीची कुलगुरुपदी निवड करण्यास अडचण नाही.
– डॉ. अरुण अडसूळ, माजी कुलगुरू