नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा : समन्वयक निवडीसाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक शनिवारी (दि. 13) आभासी स्वरूपात होणार आहे. प्रमुख विरोधी नेत्यांच्या उपस्थितीत होणार्या या बैठकीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांची समन्वयकपदी, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची आघाडीच्या अध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. मात्र, तृणमूल काँग्रेसने या बैठकीकडे पाठ फिरविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
सूत्रांनी सांगितले की, इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांनी नितीशकुमार यांच्या समन्वयकपदावर नियुक्तीला सहमती दर्शविली आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे, उद्याच्या बैठकीमधील उपस्थितीबद्दलही तृणमूल काँग्रेसने आपला निर्णय कळविलेला नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, उद्याच्या आभासी बैठकीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधींचा सहभाग नसेल.
सर्व विरोधी पक्षांची इंडिया आघाडी तयार झाल्यापासूनच नितीशकुमार यांचे नाव समन्वयकपदासाठी आघाडीवर होते. परंतु, आघाडीच्या पाटणा, बंगळूर, मुंबई आणि दिल्ली अशा चार बैठका होऊनही समन्वयक नियुक्ती झाली नव्हती. विशेष म्हणजे, दिल्लीतील बैठकीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचे नाव पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, समन्वयकपदाचा उल्लेखही न झाल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार अस्वस्थ असल्याची चर्चा रंगली होती. या सार्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडी इंडियाची शनिवारी होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.