Latest

सीमा हैदर

backup backup

पाकिस्तानातील चार मुलांची आई पब्जी खेळता खेळता एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडते आणि त्याच्यासाठी व्हाया दुबई, नेपाळ चक्क भारतातही येऊन राहते. वरकरणी हे प्रकरण प्रेमात आंधळ्या झालेल्या व्यक्तींचे वाटणे साहजिकच आहे. मात्र, पाकिस्तानची सीमा हैदर आणि भारतातील सचिन मीणा यांच्या या तथाकथित 'लव्ह स्टोरी'ला वेगळे कंगोरेही असणे साहजिकच होते. याचे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील शत्रुत्वाची पार्श्वभूमीही या प्रकरणाला आहे.

नेपाळमध्ये दोघांनी लग्न केले आणि दोघे दिल्लीजवळील ग्रेटर नोएडामध्ये आले. नेपाळमध्ये टुरिस्ट व्हिसा घेऊन आलेल्या या पाकिस्तानी महिलेने आपल्या चार मुलांसह भारतात कसा प्रवेश मिळवला, हे एक गूढच आहे. इतकेच नव्हे, तर भारतात आल्यावर जवळजवळ दीड महिना ती निवांत राहिलीही होती; मात्र त्यानंतर तिची माहिती पोलिसांपर्यंत गेल्यावर ती चर्चेत आली व तपास सुरू झाला. यामध्ये केवळ यूपी एटीएसच नव्हे, तर केंद्रीय यंत्रणाही समाविष्ट झाल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. परराष्ट्र मंत्रालयही याबाबत सक्रिय असून पाकिस्तानातील भारतीय दूतावासाकडून माहिती गोळा केली जात आहे. केवळ पाचवी शिकल्याचा दावा करणारी सीमा हिंदी व इंग्रजी फर्राटेदार बोलू शकते. हिंदू संस्कृती व चालीरीतींविषयीची तिला चांगली माहिती आहे. मीडियासमोर किंवा तपास अधिकार्‍यांसमोर ती ज्या सहजतेने बोलत असते ते पाहता किंवा तिची सोशल मीडियातील सक्रियता पाहता ती एक प्रशिक्षित हेर असावी, असा संशय कुणालाही येऊ शकतो. तिच्याकडे अनेक मोबाईल फोन आणि सिम कार्ड आढळल्याने संशय गडद झाला. केवळ सचिनच नव्हे, तर दिल्लीच्या परिसरातील अन्यही काही पुरुषांना तिने यापूर्वी पब्जीच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, असेही दिसून आले आहे.

तिने सैन्याच्या एका अधिकार्‍यालाही फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती! तिने एक सिम कार्ड नेपाळमध्येच का फेकले, 70 हजार रुपयांचा मोबाईल दोन-तीन दिवसांमध्येच का फेकला, याची कारणे तिने दिलेली नाहीत. तिचा आर्थिक स्रोतही गूढच आहे. बारा लाखांत पाकिस्तानातील घर विकून आपण आल्याचे ती सांगत असली, तरी तिने घर विकल्याची पुष्टी झालेली नाही. उलट ती तिथे भाड्याच्या घरात राहत होती, असे दिसून आले आहे. तिचे वडील आणि भाऊ पाकिस्तानी सैन्यात आहेत, हे विशेष! त्यामुळे ती पाकिस्तानच्या 'आयएसआय' या गुप्तचर संस्थेची हेर असावी, असाच अनेकांना संशय आहे. तिच्याबाबतचे गूढ लवकरच उलगडले जाईल; मात्र तोपर्यंत ती निव्वळ एक 'प्यार की दिवानी' आहे, असे समजून चालणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT