कोझिकोड, वृत्तसंस्था : केरळमधील कोझिकोडमध्ये एका 30 वर्षांच्या महिलेच्या पोटातून कात्री बाहेर काढली आहे. ऑपरेशनदरम्यान या कात्रीचा वापर रक्तवाहिन्या पकडण्यासाठी केला जातो. हर्षिना नावाच्या महिलेच्या पोटात 2017 पासून ही कात्री होती. सिझेरियन करण्यात आले त्यावेळी डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे ही कात्री तिच्या पोटात राहिली होती.
गेल्या पाच वर्षांपासून उच्च अँटिबायोटिक्स घेऊन हर्षिना पोटदुखी सहन करत होती; मात्र दुखणे अधिकच वाढल्याने कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये हर्षिना दाखल झाली. डॉक्टरांनी अथक प्रयत्नानंतर हर्षिनाच्या पोटातून कात्री बाहेेर काढली. 2017 मध्ये हर्षिनाचे तीसर्यांदा सिझेरियन करण्यात आले. यानंतर पोटात खूपच दुखू लागले.सिझेरियनमुळे पोटात दुखत असावे, असा माझा समज झाला. मी अनेक डॉक्टरांकडे उपचार केले; मात्र काहीच उपयोग झाला नसल्याचे हर्षिना हिने सांगितले.
आता याप्रकरणी केरळ सरकारकडे हर्षिनाने तक्रार केली आहे. याप्रकरणी जबाबदार असणार्यांवर कडक कारवाईचे आदेश वीणा जॉर्ज यांनी दिले आहेत.