Latest

Aliens : 2029 पर्यंत एलियन्सशी होणार संपर्क?

Arun Patil

वॉशिंग्टन : 'एलियन्स' म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांचा शोध सातत्याने सुरूच आहे. आता कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांच्या टीमने म्हटले आहे की 2029 पर्यंत एलियन्स पृथ्वीशी संपर्क साधू शकतात. सन 2002 मध्ये 'नासा'ने डेटा पाठवण्यासाठी तसेच कम्युनिकेशन स्थापन करण्यासाठी एक नियमित प्रोटोकॉलमध्ये 'पायोनियर 10' प्रोबसाठी रेडिओ लहरी अंतराळात पाठवल्या होत्या. हे सिग्नल्स पृथ्वीपासून सुमारे 27 प्रकाशवर्ष अंतरावरील एका तार्‍यापर्यंतही पोहोचले होते. संशोधकांना आशा आहे की हे सिग्नल्स एलियन्सनी 'इंटरसेप्ट' केले असावे व त्याचे प्रत्युत्तर ते पृथ्वीकडे पाठवू शकतात.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्रज्ञ हावर्ड इसाकसन यांनी सांगितले की ही संकल्पना अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ कार्ल सागन यांची होती. त्यांनी 'काँटॅक्ट' या चित्रपटातील एका प्लॉट थीमच्या रूपाने ती सादर केली होती. आता याबाबतच्या संशोधनात पृथ्वीपासून 'व्होएजर-1', 'व्होएजर-2', 'पायोनियर 10' आणि 'पायोनियर 11' तसेच 'न्यू होरायझन्स'कडे पाठवलेल्या सिग्नल्सचा वापर करण्यात आला. त्याच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी मॅपिंग करून हे पाहिले की सिग्नल्स कुठे कुठे फैलावू शकतात. अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वैज्ञानिक डेटा आणि टेलिमेट्री डेटा डाऊनलोड करण्यासाठी या अंतराळयानांनी डीप स्टेशन नेटवर्क रेडिओ अँटेनासह संचार केला. 'व्होयोजर 2', 'पायोनियर10' आणि 'पायोनियर 11'चे प्रसारण यापूर्वीच किमान एका तार्‍यापर्यंत पोहोचले आहे. 'पायोनियर 10'चे ट्रान्समिशन 2002 मध्ये एका सफेद खुजा ग्रहापर्यंत पोहोचले होते. अन्य सिग्नल 2313 पर्यंत 222 तार्‍यांपर्यंत जातील. टीमने म्हटले आहे की लवकरात लवकर म्हणजे 2029 पर्यंत ट्रान्समिशन परत येण्याची आशा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT