Latest

बुलढाणा : एसबीआय शाखा व्यवस्थापकाच्या खुनाचे रहस्य उलगडले; पैशाच्या लालसेने लॉज मॅनेजरने केला खून

अमृता चौगुले

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : लोणार तालूक्यातील हिरडव येथील एसबीआय शाखा व्यवस्थापकाच्या खुनाचे रहस्य पोलीस तपासात उलगडले आहे. शाखा व्यवस्थापक उत्कर्ष पाटील हे मेहकर शहरातील ज्या लॉजवर मुक्कामी असायचे तेथील लॉज मॅंनेजरनेच पैशाचे लालसेपोटी पाटील यांचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खून करून पसार झालेला संशयित आरोपी गणेश देशमाने (रा. चिखली) याला एलसीबीच्या पथकाने डोंबिवली येथून जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मुंबई येथील रहिवासी व बुलढाणा जिल्ह्यात तात्पुरत्या नियुक्तीवर आलेले हिरडव (ता.लोणार) येथील एसबीआय शाखा व्यवस्थापक उत्कर्ष पाटील (वय ३६) यांचा मृतदेह १ जानेवारीच्या सायंकाळी मेहकर शहराजवळील सारंगपूर फाट्यावरील ऊसाच्या एका शेतात आढळून आला होता. अज्ञात मारेकऱ्याने पाटील यांच्या खुनासाठी वापरलेला चाकू तसेच मयत उत्कर्ष पाटील यांचा मोबाईल व अज्ञात आरोपीचा मोबाईल असे दोन मोबाईल्सही घटनास्थळी मृतदेहाजवळ आढळून आले होते. त्यातील एक मोबाईल हा मेहकर शहरात एका लॉजवर मॅनेजर म्हणून काम करणा-या गणेश देशमाने याचा असल्याचे तपासात समोर आले होते.

खून करुन आरोपी देशमाने हा पसार झाला होता. पोलिसांना तपासादरम्यान आरोपीच्या पत्नीने सांगितले की, आरोपीने खुनानंतर रक्ताने माखलेले त्याचे कपडे डोणगाव रस्त्यावरील क्रीडा संकूलाजवळ फेकून दिले होते. पोलिसांनी ते कपडे ताब्यात घेतले आहेत. त्याकामी पत्नीने आरोपी पतीला मदत केल्याने तिलाही सहआरोपी केले आहे. उत्कर्ष पाटील यांचा खुन झाल्यानंतर त्यांच्या एटीएम कार्डद्वारे दोनवेळा पैसे काढल्याचे झाल्याचे तपासात समोर आले आहे.

एसबीआय शाखा व्यवस्थापक उत्कर्ष पाटील यांनी अलिकडेच सेवेचा राजीनामा सादर केलेला असल्याने तो मंजूर होण्याच्या अवधीपर्यंत त्यांची एसबीआयच्या हिरडव शाखेवर तात्पुरती नियुक्ती झालेली असल्याने ते मेहकर शहरातील एका लॉजवर मुक्कामी राहत होते. लॉजचा मॅनेजर गणेश देशमानेशी त्यांची ओळख झाली होती. लॉजवरील अन्य ग्राहक बाहेर जातांना रूमची चावी काउंटरवर जमा करायचे. मात्र पाटील हे चावी सोबत घेऊन जात असल्यामुळे त्यांचेकडे(त्यांचे खात्यात) भरपूर पैसे असावेत, त्यांनी सेवेचा राजीनामा सादर केलेला असल्याने मोठ्या रकमेचे घबाड हाती लागू शकेल अशा लालसेने गणेश देशमाने याने पाटील यांचा खून करण्याचा कट रचला.

घटनेच्या एक आठवड्यापूर्वी त्याने कमी पगाराचे कारण दाखवत लॉजवरील नोकरी सोडली. मात्र पाटील यांचेशी मोबाईलवरून संपर्क कायम ठेवला. थर्टी फर्स्टचे निमित्त शोधून मद्य पिण्याचे बहाण्याने गणेश देशमाने हा उत्कर्ष पाटील यांना सारंगपूर फाट्यावरील ऊसाच्या शेताजवळ घेऊन गेला तेथे त्याने धारदार चाकूने गळा चिरून पाटील यांचा खून केला. पण चाकू आणि दोघांचे मोबाईल्स घटनास्थळीच सापडल्याने आरोपी हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. संशयित आरोपी गणेश देशमाने याला घेऊन पोलिसांचे पथक गुरुवारी पहाटे मेहकर शहरात दाखल झाले.

-हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT