कसबा वाळवे, पुढारी वृत्तसेवा : सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणून त्याला जीवंत केले अशी आख्यायिका आहे.मात्र कसबा वाळवे येथे वटपौर्णिमेदिवशीच दूधगंगा नदीमध्ये बुडणाऱ्या मुलग्याला एका महिलेने पोहत जाऊन वाचवत हिरकणीची कामगिरी केली. वटपौर्णिमेदिवशी वडाची पूजा करण्यासाठी कोमल विनायक भाट आपल्या राजवर्धन आणि हर्षवर्धन या दोन मुलांना सोबत घेऊन महिलांबरोबर दूधगंगा नदीघाट परिसरातील वडाजवळ गेल्या होत्या.
वडाची पुजा करत असताना दोन्ही मुलांना खाण्यासाठी आंबे देऊन भाट अन्य महिलांसोबत थांबल्या होत्या.यावेळी हात धुण्यासाठी हर्षवर्धन न सांगताच नदीमध्ये उतरला.दरम्यान माया सुभाष साठे या घाटावर कपडे धुण्याचे काम करीत असताना लहान मुलाचे चप्पल पाण्यावर तरंगत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.मात्र त्यांनी दूर्लक्ष केले. थोड्या वेळाने नदीच्या मध्यभागी एक पाय वरती आल्याचे त्यांनी पाहिले. साठे यांनी घाटावर येऊन आरडाओरडा करून मदत घेण्याचा प्रयत्न केला परंतु कुणाचेही याकडे लक्ष नव्हते. क्षणाचाही विचार न करता त्यांनी नदीत उडी मारून बुडणाऱ्या मुलाला धरुन काठावर आणले.त्याच्या पोटातील पाणी काढून त्याला शुध्दीवर आणले .दरम्यान हर्षवर्धनच्या आई कोमल यांना ही घटना समजताच त्या धावत येऊन त्याला जवळ घेत साठे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करु लागल्या.
माया सुभाष साठे या महिलेने जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारून मुलाला बाहेर काढले. एरवी महिला संकटाच्या वेळी घाबरून पुरुषांचा धावा करत मदतीची याचना करतात, मात्र या जीगरबाज रणरागिणीने मदत मिळाली नाही म्हणून घाबरून न जाता व वेळ न दवडता नदीत उडी मारून बुडणाऱ्या मुलग्याला वाचवले. साठे यांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव केला आहे.
याबाबत हर्षवर्धन याची माता कोमल विनायक भाट यांना विचारता त्यांना गलबलून आले. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी साक्षात सावित्रीच माया यांच्या रुपात आली होती.जर त्यांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर माझे बाळ मला मिळाले नसते व कदाचित माझेही बरेवाईट झाले असते.खऱ्या अर्थाने त्या माऊलीने आम्हा दोघांना वाचवले आहे,त्यांचे मी आयुष्यभर उपकार विसरु शकत नाही असे डबडबलेल्या डोळ्यांनी सौ भाट यांनी सांगितले.
साठे यांना पोहता येत होते म्हणून त्या नदीत उडी मारून बुडणाऱ्या मुलाला वाचवू शकल्या.जर त्यांना पोहता येत नसते तर… प्रसंग वेगळा घडला असता.म्हणून मुलांबरोबरच मुलींनीही पोहण्याचे प्रशिक्षण तज्ञांकडून घ्यायला हवे असे बोलले जात होते.