बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : सौंदत्ती येथील रेणुकादेवीच्या यात्रेनिमित्त सुमारे तीन लाख भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत. उदं… गं आई उदं…च्या गजरात भाविकांकडून भंडार्याची उधळण केली जात आहे. सोमवारी देवीचा कंकण आणि मंगळसूत्र विसर्जन कार्यक्रम पार पडला. मंगळवारी दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले. (Saundatti Yellamma Yatra)
रेणुकादेवीच्या यात्रेनिमित्त यल्लम्मा डोंगरावर पश्चिम महाराष्ट्रातील विशेषकरून कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा या भागातील रेणुका भक्त दाखल झाले आहेत. डोंगरावर भक्तांची गैरसोय होेऊ नये, यासाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, यासाठी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार डोंगरावर पाणी, स्वच्छतागृहे, पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी दर्शन रांगा सुरू करण्यात आल्या आहेत. (Saundatti Yellamma Yatra)
मंगळवारी कोल्हापुरातील मानाचे जग यल्लम्मा डोंगराकडे रवाना झाले होते. पश्चिम महाराष्ट्रातून अडीचशे बसेस तसेच खासगी वाहनांतून सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक डोंगरावर दर्शनासाठी दाखल झाले आहेत. रेणुकादेवीचा उदो उदो केला जात असून, भाविकांकडून भंडार्याची उधळण केली जात आहे.
यात्रा शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस खात्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सौंदत्ती यल्लम्मा देवस्थान कमिटीकडून सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. डोंगरावर देवीच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी जोगनभावी कुंडात स्नान करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. भाविकांकडून परडी भरण्याचे कार्यक्रम पार पाडले जात आहेत. महिला भाविकांसाठी डोंगरावर स्वतंत्र स्नान व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त भंडारा, कुंकू, प्रसाद यासह विविध खेळण्यांच्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहेत.