वॉशिंग्टन : आपल्या ग्रहमालिकेतील वैशिष्ट्यपूर्ण ग्रह म्हणजे शनी. शंभरपेक्षा जास्त चंद्र आणि सभोवती असलेली कडी यामुळे हा ग्रह वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. शनीची ही विशाल कडी अनेक शतकांपासून खगोलशास्त्रज्ञांचा कुतूहलाचा विषय बनून राहिली आहे. ही कडी कशी निर्माण झाली असावी याबाबत सातत्याने संशोधन होत असते. आता एका नव्या संशोधनात आढळले आहे की शनीभोवती फिरणार्या दोन चंद्रांची धडक होऊन या कडीची निर्मिती झाली. हे दोन्ही चंद्र बर्फाच्छादीत होते.
शनी हा ग्रह नेहमीच केवळ आपल्या ग्रहमालिकेतील नव्हे तर ब्रह्मांडातीलच सर्वाधिक आकर्षक ग्रह बनून राहिलेला आहे. त्याचे प्रमुख कारण शनीभोवती असणार्या सात कड्या. शनी हा आपल्या ग्रहमालिकेतील गुरुनंतरचा सर्वात मोठा ग्रह आहे. आता नव्या संशोधनात या ग्रहाच्या कडीचा अधिक तपशीलवार अभ्यास करण्यात आला. अनेक कॉम्प्युटरवर सिमुलेशननंतर हे संशोधन शक्य झाले. त्यामध्ये 'नासा'च्या कॅसिनी मोहिमेतून मिळालेल्या डेटाचा वापर करण्यात आला.
'नासा'ने शनी व त्याचे अनेक चंद्र यांच्या निरीक्षणासाठी कॅसिनी यान सोडले होते. 2004 ते 2017 दरम्यान ही मोहीम राबवल्यानंतर कॅसिनीला शनी ग्रहावरच क्रॅश करून ही मोहीम संपवण्यात आली होती. कॅसिनीने आपल्या मोहिमेत अनेक प्रकारची माहिती दिलेली आहे. या डेटावर अजूनही संशोधन होत असते. 'कॅसिनी'ला आढळले होते की ज्या सामग्रीपासून ही कडी बनलेली आहे, तिच्यामध्ये बर्फाचे कणही आहेत. हे कण अतिशय प्राचीनही असून त्यांना धुळीने प्रदूषित केलेले नाही. शनी ग्रहाच्या या कडीचा सर्वात पहिला शोध गॅलिलियोने सन 1610 मध्ये लावला होता.
कॅसिनीच्या डेटामधून स्पष्ट झाले की शनीची ही कडी तुलनेने अलीकडच्या काळात बनलेली आहे. तिचे वय काही लाख वर्षांचेच असू शकते. आपली सौरमालिका 4.5 अब्ज वर्षांपूर्वीची आहे. या संशोधनात नासा आणि ब्रिटनच्या दरहम युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यांनी म्हटले आहे की काही लाख वर्षांपूर्वी दोन चंद्रांची धडक होऊन ही कडी निर्माण झाली. वैज्ञानिकांनी शक्तिशाली सुपरकॉम्प्युटरच्या मदतीने या धडकेची शक्यता वर्तवली. दोन बर्फाळ चंद्रांची धडक होऊन त्यांच्या सामग्रीचा ढीग शनी ग्रहाकडे खेचला गेला आणि तो शनीभोवती फिरू लागला. त्यापासून ही कडी निर्माण झाली.