वॉशिंग्टन : भारताने 'चांद्रयान-3' यशस्वी करून दाखवल्यानंतर अंतराळाबाबत आणखी उत्सुकता वाढली आहे. अवघे जग भारताच्या या यशाचे कौतुक करत आहे. यादरम्यान अंतराळात अशी एक खगोलीय घटना साकारली जाणार आहे, जी दुर्मीळ मानली जाते. येत्या काही तासांत शनी ग्रह पृथ्वीच्या बराच जवळ येणार आहे. यादरम्यान, पृथ्वीवरून कोणत्याही उपकरणाशिवाय शनी ग्रहाला अधिक सुस्पष्टपणे पाहता येईल. 'नासा'ने म्हटले आहे की, स्वच्छ आकाश व पूर्ण अंधार असेल तर दुर्बिणीच्या माध्यमातून आणखी स्पष्टता येऊ शकेल.
शनी ग्रह यावेळी आकाशात अधिक मोठा व चमकलेला दिसून येणे अपेक्षित आहे. आज शनी सूर्याच्या थेट विरोधी बाजूला असेल. त्यामुळे, हे असे होणार असल्याचे 'नासा'ने म्हटले. सूर्याच्या प्रकाशामुळे शनी ग्रह फेब्रुवारी 2024 पर्यंत द़ृश्य असेल. यादरम्यान, शनी ग्रहाला सहजपणे ओळखता देखील येईल, असे 'नासा'चे मत आहे.
शनी पृथ्वीपासून सर्वात दूर वसलेल्या ग्रहांपैकी एक आहे. मात्र, ऑगस्टमधील शेवटच्या आठवड्याभरात तो सहजपणे ओळखता येईल. 'नासा'ने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यास्तावेळी दक्षिणपूर्व क्षितिजावर त्याचे दर्शन होऊ शकते. शिवाय, सूर्योदय होईतोवर पूर्ण रात्रभरात शनी ग्रह सुस्पष्ट असणार आहे.