रेझाविक : पृथ्वीच्या कक्षेतील वाढत्या सॅटेलाईटसनी शास्त्रज्ञांनाही आता चिंतेत टाकण्यास सुरुवात केली आहे. आईसलँड विद्यापीठातील प्लाझ्मा भौतिकीचे पीएचडी संशोधक सिएरा सॉल्टरच्या मताप्रमाणे इंटरनेटच्या वाढत्या गरजेमुळे सॅटेलाईटसची संख्या वाढत चालली आहे आणि याचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात अप्रत्यक्ष परिणाम होत चालला आहे. तूर्तास, स्पेसएक्स, अमेझॉन, वन वेबसारख्या कंपन्या आपल्या छोट्या-मोठ्या प्रयोगांसाठी धडाधड उपग्रह सोडत आहेत. त्याचा हा फटका मानला जात आहे.
अंतराळ संशोधनात यापूर्वी तीन दशकांत जितके उपग्रह सोडले गेले, तितकेच किंबहुना त्याहून अधिक उपग्रह मागील एक-दोन वर्षांच्या अल्प कालावधीतच सोडले गेले आहेत, यावरूनच याचे प्रमाण किती प्रचंड वेगाने वाढले आहे, हे दिसून येते. आता ज्या प्रोजेक्टसाठी हे उपग्रह सोडले जात आहेत, ते महत्त्वाकांक्षी असल्याचा या कंपन्यांचा दावा आहे. मात्र, यामुळे पर्यावरणाला किती प्रचंड प्रमाणात हानी पोहोचते आहे, याकडे मात्र अर्थातच यावेळी सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे प्रातिनिधिक चित्र आहे.
प्रदूषण, कक्षेत एकमेकांवर आदळण्याची भीती आणि ओझोनवरील दुष्परिणाम यात तर मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम दिसून येत आहेत. शिवाय, यापेक्षाही मोठी चिंता म्हणजे पृथ्वीची चुंबकीय ढाल कमजोर होत असल्याची भीती संशोधकांमधून व्यक्त केली जात आहे.