सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातार्यात होणार्या 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी स्पर्धेच्या ठिकाणी मल्ल उपस्थित राहणार आहेत. सकाळी मल्लांचे वजन झाल्यानंतर दुपारी 4 नंतर कुस्त्यांचा फड सुरू होणार आहे. विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ना. शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा दि. 5 ते 9 एप्रिल या कालावधीत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे होत आहे. या स्पर्धेत माती आणि गादीवरील (मॅट) प्रत्येकी 10 अशा एकूण 20 गटांमध्ये कुस्ती स्पर्धा घेतल्या जातील. 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 किलो आणि महाराष्ट्र केसरी गट असे दहा वजनी गट आहेत. तब्बल 900 कुस्तीगीर मल्ल व 100 पंच या स्पर्धेसाठी सातारा येथे दाखल झाले आहेत. मातीवरील कुस्तीसाठी 2 आणि मॅटवरील कुस्तीसाठी 3 आखाडे सज्ज करण्यात आले आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलात ही कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. त्यासाठी क्रीडा संकुलाच्या मैदानावर 40 बाय 80 फूट आकाराचे मोठे स्टेज उभारण्यात आले आहे. त्यामध्ये 60 बाय 50 मीटरवर मातीवरील कुस्तीसाठी दोन आखाडे तर मॅटवरील कुस्तीसाठी तीन आखाडे तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आखाड्याच्या बाहेर दहा फूट अंतरामध्ये सर्व पंच कमिटींची बसण्याची व्यवस्था तर त्याच्या बाहेर 10 फूट अंतरामध्ये खेळाडूंच्या वॉर्मअपची सोय करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मल्लांसाठी विशेष पासची सोय करण्यात आली आहेे. कुस्ती शौकिनांसाठी तब्बल 55 हजारांची आसन क्षमता तयार करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने महाराष्ट्र केसरीच्या यजमान पदाची मजबूत तयारी केली आहे.
45 संघातून 900 मल्ल पाच आखाड्यांमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. 12 विभागांच्या माध्यमातून जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक व जिल्हा तालीम संघाचे समन्वयक सुधीर पवार यांच्यामार्फत स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.
आयुष्यात एकदा तरी महाराष्ट्र केसरी व्हावे, असे प्रत्येक पैलवानाचे स्वप्न असते. ही मानाची स्पर्धा जिंकणार्याला मान सन्मान मिळत असतो. तसेच बक्षीसेही असल्याने या स्पर्धेत होेणार्या कुस्त्या थरारक होणार आहेत.
सकाळी 9 वाजेपर्यंत : पंचांचे आगमन
सकाळी 9.30 ते 11 : पंच उजळणी वर्ग
दुपारी 12 वाजेपर्यंत : सर्व शहर व जिल्हा संघांचे आगमन
दुपारी 12 ते 2 : कुस्तीगिरांची वैद्यकीय तपासणी व वजने
सायं. 4 ते 8 वाजेपर्यंत : 57 , 70 व 92 कि. मल्लांच्या कुस्त्या