Latest

सातार्‍यात महायुतीची जय्यत तयारी

Arun Patil

सातारा, पुढारी वृत्तसेवा : लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर आल्याने महायुतीची महत्त्वाची बैठक शुक्रवारी सातार्‍यातील शासकीय विश्रामगृहावर झाली. यावेळी खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्यासह महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेतही सातारा आणि माढा मतदारसंघांत महायुतीचाच खासदार निवडून आणण्याचा निर्धार करत एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. दरम्यान, सातार्‍यात रविवार, दि. 14 जानेवारी रोजी महामेळावा होणार असल्याचे जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर महायुतीच्या बैठकांना जोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच सातार्‍यात महाविकास आघाडीतीलही घटक पक्षांनी एकत्रित येत एकजूट दाखवली होती. त्याला काही कालावधी उलटत नाही तोवर महायुतीच्या सातार्‍यातील घटक पक्षाच्या सर्व नेत्यांनी शुक्रवारी एकत्रित येत महायुतीची एकजूट दाखवली. या बैठकीत रविवारी सातार्‍यातील गांधी मैदान येथे महामेळावा घेवून महायुतीची अभेद्य युती दाखवण्याचा निर्धार करण्यात आला.

शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. श्री.छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. दीपक चव्हाण, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड तसेच भाजपचे विक्रम पावसकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, भीमराव पाटील यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेला या पदाधिकार्‍यांसह पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. रणजितसिंह ना. निंबाळकर, आ. महेश शिंदे यांचीही उपस्थिती होती.

बैठक व पत्रकार परिषदेतून एकी दाखवण्याचा प्रयत्न झाला. तसेच यावेळी सातार्‍यात रविवार दि. 14 जानेवारी रोजी होणार्‍या महायुतीच्या मेळाव्याचे ठिकाण आणि दिशा ठरवण्यात आली. सातार्‍यातील गांधी मैदानावर दि. 14 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता महायुतीचा महामेळावा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यात लोकसभेला 45 पेक्षा अधिक खासदार निवडून आणले जाणार आहेत. तसेच सातारा आणि माढ्याचा खासदारही महायुतीचा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीवेळी दोन्ही राजांमध्ये सुसंवाद

महायुतीच्या बैठकीत खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले एकत्रितपणे दिसले. महायुती म्हणून या दोन्ही नेत्यांमध्ये सुसंवादाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्यपातळीवर महायुतीत एकी आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील गावागावांतही एकी दाखवून देऊ, असेही यावेळी सर्वच पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. लोकसभेला उमेदवार कोण असणार हे महत्त्वाचे नाही. यापेक्षा राज्यस्तरावरील बैठकीत उमेदवार निश्चित होईल, त्या आदेशाप्रमाणे निवडणुकीत एकसंधपणे काम केले जाईल, असेही यावेळी सर्वांनी जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT