Latest

सातारा राष्ट्रवादीत गलबला… कोण काय म्हणाला…

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सातारा जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गलबला झाला. कुणी म्हणतयं आम्ही पवार साहेबांसोबत तर कुणी म्हणतंय आम्ही दादांसोबत. त्याचबरोबर काही जणांनी पक्षासोबत राहणार असल्याचा नारा देत फाटाफूटीवर नाराजी व्यक्त केली. काही पदाधिकार्‍यांनी फोनही उचलले नाहीत. निष्ठावंत मात्र आपआपल्या नेत्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनीही अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा समिंद्रा जाधव, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष वैभव कळसे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

महाबळेश्वर संमिश्र

महाबळेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते नितीन बाळासाहेब भिलारे व माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांनी आ. मकरंद पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत रहावे, असे म्हटले आहे. तर जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, महाबळेश्वरचे माजी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, ज्येष्ठ नेते बाबुराव सपकाळ यांनी आ. मकरंद पाटील यांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे. तालुक्यातील बहुतांश पदाधिकार्‍यांनी पक्षात फुट असू नये असे म्हटले आहे.

वाई : मकरंदआबांच्या भूमिकेनंतर ठरवू…

वाई तालुक्यातून किसनवीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, माजी उपसभापती महादेव मस्कर, सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, माजी सभापती दिलीपबाबा पिसाळ, माजी उपसभापती मदनअप्पा भोसले यांनी या संदर्भात आ. मकरंद आबा सोमवारी कारखानास्थळावर बैठक घेणार असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांना विचारात घेवून आ. मकरंद पाटील भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याचवेळी आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे या पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

कोरेगाव साहेबांसोबत

माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, तालुकाध्यक्ष भास्कर कदम यांनी आ. शशिकांत शिंदे घेतील त्या निर्णयाशी सोबत राहणार असल्याचे सांगितले. खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजी क्षीरसागर यांचा संपर्क होवू शकला नाही. माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर यांनी दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

फलटणला रामराजे म्हणतील ते…

फलटण तालुक्यात शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, माजी सभापती रेश्मा भोसले यांनी रामराजेंच्या भूमिकेसोबत ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांनी दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सोशल मीडिया अध्यक्ष फिरोज बागवान यांनी तालुक्यात आ. रामराजे आणि राज्यात खा. शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले.

सातारा-जावली बहुतांश शरद पवारांकडे

सातारा तालुक्यातील पदाधिकार्‍यांमध्येही फुटीचे बीज पेरले आहे. सेवादल प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र लांवघरे, सेवादल प्रदेश संघटिका सौ. सीमा जाधव, किसनवीरचे संचालक सचिन जाधव, जिल्हा सरचिटणीस युवराज पवार, माजी सभापती धर्मराज घोरपडे, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शशिकांत वाईकर यांनी शरद पवारांसोबत असल्याचे जाहीर केले. तर तालुकाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी पक्षाबरोबर असल्याचे म्हटले आहे. माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील कुटूंब व कार्यकर्त्यांशी बोलून ठरवू असे म्हणत आहे. माजी जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले.
जावलीतील जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव धनावडे, युवा तालुकाध्यक्ष आतिष कदम यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे.

खंडाळा तालुका कुणाकडे?

खंडाळा तालुक्यातील अनेक पदाधिकारी मात्र अजित पवार यांच्या पाठिशी असल्याचे चित्र आहे. खंडाळा तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, माजी सभापती राजेंद्र तांबे, अजय भोसले, लोणंद शहर युवक अध्यक्ष सागर शेळके यांनी आ. मकरंद पाटील घेतील त्या निर्णयासोबत असल्याचे म्हटले आहे. तर माजी कृषी सभापती मनोज पवार आणि लोणंदचे डॉ. नितीन सावंत यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

माणचे पदाधिकारी पवारांची भेट घेणार

माणचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी सध्या आम्ही खा. शरद पवार यांच्यासोबत असून कराडमध्ये त्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. मनोज पोळ यांची भूमिका स्पष्ट नाही. म्हसवडचे माजी उपनगराध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले. तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, युवक अध्यक्ष विक्रम शिंगाडे व विधानसभा अध्यक्ष प्रशांत वीरकर यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर कराड येथे शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

खटाव : पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार

खटाव तालुक्यात तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी पदाधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेणार असून युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT