वडूज: भाजपा मेळाव्यात मार्गदर्शन करताना आ. जयकुमार गोरे.  
Latest

सातारा : ‘महाविकास आघाडीचे सरकार अपशकुनी’

backup backup

खटाव ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महाविकास आघाडीचे अपयशी सरकार अपशकुनी आहे. ते सत्तेत आल्यावर कोरोना आला, मराठा, ओबीसी आणि पदोन्नतीतील आरक्षण गेले, अतिवृष्टीने नुकसान झाले, अशा राज्याचे नुकसान करणार्‍या अनेक घटना घडल्या. आगामी काळात संघटनात्मक बांधणी असलेला भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ताच राष्ट्रवादीच्या नेत्यापेक्षा मोठा असतो, असा टोला भाजपा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी लगावला.

वडूज येथे आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, विकल्प शहा, अनिल माळी, विश्वासराव काळे, नगरसेविका रेश्मा बनसोडे, रेखा माळी, किशोरी पाटील, जयवंत पाटील, सोमनाथ जाधव, बनाजी पाटोळे, प्रदीप शेटे, ओंकार चव्हाण, काकासाहेब बनसोडे, प्रशांत गोडसे, नीलेश करपे, सर्व नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. गोरे म्हणाले, गेल्या 14 वर्षांपासून दोन्ही तालुक्यातील अनेक महाभागांना फलटण, बारामतीपासून जिल्ह्यातील मातब्बरांची फौज विरोधात असूनही जयकुमार तीन वेळा आमदार कसा झाला?, असा प्रश्न पडला आहे. माझ्यामागे सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेची ताकद असल्यानेच हे शक्य झाले, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पूर्णत्वाला गेलेल्या विकासकामांची उद्घाटने करण्याव्यतिरिक्त आघाडी सरकारने अडीच वर्षांत काहीच केले नाही, असे सांगून आ. जयकुमार म्हणाले, कोरोना काळात सर्वसामान्यांची काळजी करणार्‍या केंद्रानेच बाधितांवर उपचार, लसीकरण, मोफत धान्य, शेतकर्‍यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले. राज्याने केंद्राच्या नावाने ओरडण्याशिवाय काहीच केले नाही. राज्याचे गृहमंत्रीच अटकेत आहेत. अनेकांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. 2024 मध्ये स्वबळावर सत्ता आणण्याचा भाजपने संकल्प केला आहे. सातारा जिल्ह्यातही भाजप एक नंबरचा पक्ष होणार आहे, असेही ते म्हणाले.

मी जिल्हाध्यक्ष झाल्याने अनेकांना धास्ती लागली आहे. काहींनी माझा मतदारसंघ टार्गेट करायचा प्लॅन आखायला सुरुवात केली आहे. पण, त्यांनी काळजी करू नये, आमचे दोन्ही तालुक्यांचे अध्यक्ष पक्षवाढीसाठी अहोरात्र परिश्रम करत आहेत. मतदारसंघातील माझा साधा कार्यकर्ताही विरोधकांना भारी आहे, असेही आ. गोरेंनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT