सातारा; पुढारी वृत्तसेवा : वेळ रात्री साडेनऊची… प्रसंग सातारा शहरानजीक कोरेगाव रोड येथील…. एकजण दुचाकीवरून घरी निघाला होता… अचानक कारमधून तिघेजण येतात आणि दुचाकीस्वाराला अडवतात… दुचाकीस्वाराचे अपहरण होते.. महामार्गावरील खिंडवाडी येथील निर्जनस्थळी कार थांबते.. पुन्हा दुचाकीस्वाराला मारहाण करून त्याच्याकडील सोने लुटले जाते. तपासाला सुरुवात होते आणि पोलिसासह तिघेजण सापडतात. मात्र, काही दिवसांतच तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र तयार केले जाते व त्यात संशयितामध्ये तो पोलिस नसल्याचा साक्षात्कार होतो. यातून एकप्रकारे प्रकरणच मॅनेज करण्याचा प्रयत्न समोर आला आहे.
ही घटना दि. 29 मे 2023 रोजी घडली आहे. या प्रकरणातील संशयितांमध्ये अनिल कदम, आकाश गंगावणे, उज्ज्वल कदम यांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद नीलेश संजय लाड (वय 29, रा. कृष्णानगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
नीलेश लाड हे एसटी स्टँन्डवरुन कृष्णानगर येथील घराकडे दुचाकीवरुन निघाले होते. दुचाकी रात्री 9.30 वाजता कोरेगाव रोडला आल्यानंतर अचानक कार आडवी मारुन त्यांना थांबवले. कारमधून तिघेजण उतरले व त्यांनी लाथा- बुक्क्यांनी मारहाण करुन कारमध्ये जबरदस्तीने बसवले.
संशयितांनी अपहरण करुन त्यातील एकाने लाड यांची दुचाकी घेतली. लाड यांना खिंडवाडी ता.सातारा गावच्या हद्दीत निर्जनस्थळी नेले. पुन्हा तेथे संशयितांनी मारहाण करुन सोन्याची चेन, घड्याळ काढून घेतले. यानंतर लाड यांना तेथेच सोडून संशयितांनी पलायन केले. लाड यांनी कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन तसेच लाड यांच्याकडून घेतलेले संशयितांचे वर्णन यावरुन तपासाला सुरुवात केली.
पोलिसांचा तपास सुरु असतानाच त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. संशयितांमध्ये एकजण पोलिस असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी संशयितांची लगेचच धरपकड करत अटक केली. न्यायालयात संशयितांना हजर केल्यानंतर त्यांना पोलिस कोठडी व पुढे न्यायालयीन कोठडी मिळाली. दुसरीकडे जबरी चोरी प्रकरणात पोलिस असल्याने पोलिसांनी याची माहिती कोणाच्या हाती लागणार नाही याची खबरदारी घेतली. पोलिसांचा तपास सुरु असताना पुन्हा या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला. लाड यांनी प्रतिज्ञापत्रक तयार करुन जबरी चोरी प्रकरणात पोलिस नसल्याचे म्हटले. सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे.
जबरी चोरी प्रकरणात पोलिसाचाच सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर पोलिस हादरुन गेले. पोलिसांनी तपास करुन याप्रकरणाचे दोषारोपपत्र तयार केले. दोषारोपपत्र छानणीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडेही पाठवले आहे. दोन महिन्यामध्ये पोलिसांनी तपास करुन प्रकरण स्ट्राँग तयार केले आहे. यामुळे दोषारोपपत्राला मान्यता मिळणार का? न्यायालयात ते कधी जाणार? आणखी यामध्ये काही ट्विस्ट निर्माण होणार का? असे सवाल उपस्थित झाले आहेत.