सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील काही कर्मचारी सहा-सहा महिने मेडिकल रजेवर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने त्याचा परिणाम कामावर होत आहे. रूग्णांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याने अतिरिक्त कर्मचार्यांचीही यामुळे गोची होत आहे.
वारंवार व सातत्याने मेडीकल रजा घेणार्या कर्मचार्यांची शारिरीक पात्रता तपासून त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करणे आवश्यक आहे. असे असताना जिल्हा परिषद व पंचायत समितीतील काही खुशालचेंडू कर्मचारी सातत्याने व वारंवार मेडीकल रजेच्या नावाखाली वर्षातून 6 महिने कार्यालयात उपस्थित नसतात.
कर्मचारी सातत्याने गैरहजर राहिल्याने त्याचा परिणाम सेवेवर होत आहे. अनेक नागरिक कामानिमित्त दूरवरून येत असतात. मात्र, संबंधित कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. तसेच कार्यालयातील उर्वरित कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढत आहे.
अस्थापना कर्मचारी व रजा मंजूर करणारे कार्यालय प्रमुख रजा मंजूर नसताना किंवा रजेवरून हजर झालेले नसताना अशा कर्मचार्यांचे वेतन सेवार्थ प्रणालीतून दरमहा नियमितपणे काढत आहेत. रजेची नोंदही सेवापुस्तकात घेतली जात नाही हा सर्व प्रकार नियमबाह्य आहे. दरमहा घरी बसून संबंधित कर्मचार्यांना पगार मिळत आहे. यामुळेच कामचुकार कर्मचारी निर्ढावलेले आहेत. असे प्रकार जिल्हा परिषदेच्या विविध विभागासह सर्वच पंचायत समित्यांमध्ये सुरू आहेत. काही कर्मचारी तर ऐन मार्च महिन्याच्या कामकाजाच्या गडबडीत रजेवर गेल्याच्या तक्रारी आहेत.
काही कर्मचारी मेडीकल रजेवरून परत आल्यानंतर त्यांना सक्षम वैद्यकीय अधिकार्यांचे फिटनेस प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. मात्र, असे न करता कर्मचारी गटविकास अधिकार्यांच्या संगनमताने मेडिकल रजेचे सेवार्थ प्रणालीतून वेतन मात्र नियमितपणे काढले जात आहे. त्यामुळे मेडिकल रजेेबाबत भोंगळ कारभार सुरू असल्याचे दिसत आहे.
सेवा पुस्तकातील रजांचा हिशोब तपासा
सातत्याने व दीर्घ काळ मेडिकल रजा घेणार्या कर्मचार्यांना शासन निर्णयानुसार अनफिट ठरवून जिल्हा परिषद सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त करण्यात यावे. याबाबत प्रशासकांनी त्वरित लक्ष घालून मेडिकल रजा मंजुरीचे संबंधित अधिकार्यांचे अधिकार काढून घेतल्यास गैरप्रकाराला आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच मेडिकल रजा घेताना कर्मचार्यांना एकप्रकारची शिस्त लागण्यास मदत होणार आहे. याशिवाय कर्मचार्यांच्या सेवा पुस्तकातील रजांचा हिशोब तपासण्यात यावा. या सर्व प्रकाराची प्रशासनाने नोंद घेवून योग्य ती कार्यवाही करावी.