Latest

Santosh Kadam murder case : ‘सुपारी’ सांगलीतून, ‘गेम’ नांदणीत!

दिनेश चोरगे

सांगली : संतोष कदम… सांगलीतील माहिती अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते… दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात निर्घृण खून झाला. त्यामागे मोठी 'सुपारी' फुटल्याची चर्चा आहे. ही 'सुपारी' सांगलीतून देऊन त्यांची नांदणीत 'गेम' केल्याचा पोलिसांना संशय आहे.

शासकीय यंत्रणेची पोलखोल!

कदम यांनी काही वर्षांपासून सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. त्यांनी अनेक आंदोलने केली. शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर सुरू केला. विशेषत: महापालिकेत त्यांची नेहमी 'करडी' नजर असायची. दररोज त्यांची तेथे उठ-बस असे.

राजकीय वैर घेतले!

राजकारण्यांचा भ्रष्टाचार काढण्यासाठीही त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा उपयोग केला. यातून अनेक राजकारण्यांशी त्यांचे वैर निर्माण झाले होते. अनेकदा त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्नही झाला. काही नगरसेवकांशी त्यांचा अनेकदा वाद झाला होता. महापालिकेत एखादी माहिती मागितली आणि ती नाही मिळाली, तर कदम आंदोलनाचे हत्यार उपसत. गतवर्षी त्यांच्याविरुद्ध विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही गुन्ह्यात आपणास जाणीवपूर्वक अडकविल्याचा आरोप त्यांनी केला होता. तरीही त्यांचे सामाजिक कार्य सुरूच होते. विविध शासकीय कार्यालयांतून सातत्याने माहिती मागविण्याचे काम ते करीत होते.

मोर्चापूर्वीच 'गेम'

कदम 9 फेब्रुवारीला (शुक्रवार) सांगलीत महापालिकेवर गाढव मोर्चा काढणार होते. मोर्चाची परवानगी काढण्यासाठी ते सात फेब्रुवारीला शहर पोलिस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांना मोबाईलवर फोन आला. हा फोन त्यांनी घेतला. थोडा वेळ बोलून कट केला. तेथून ते कार घेऊन गायब झाले. त्यादिवशी ते पुन्हा कोणाला दिसलेच नाहीत. त्यांच्या जिवाला धोका असल्याची जाणीव घरच्यांनाही होती. मोर्चा काढण्यापूर्वी दोन दिवस अगोदरच त्यांची नांदणीत 'गेम' झाली.

काही ठिकाणी फटाके फुटले!

कदम सातत्याने विविध शासकीय कार्यालयांतून माहिती मागवित असल्याने अनेक अधिकारी, ठेकेदार, राजकारणी यांच्याशी त्यांचे वैर निर्माण झाले होते. त्यांचा खून झाल्याचे वृत्त समजताच शहरात काही ठिकाणी फटाके फुटल्याची चर्चाही सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT