यवत, पुढारी वृत्तसेवा: वरूण राज्याच्या हजेरीत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्यात आगमन झाले आहे. दौंडकरांच्या वतीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. हवेली तालुक्यातून दौंड तालुक्यातील सीमेवरील बोरिभडक गावात शनिवारी 4 :30 वाजता तुकाराम महाराज पालखी सोहळा दाखल झाला. यावेळी दौंडकरांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. दौंड तालुक्यातील बोरिभडक ग्रामपंचायतच्या वतीने पालखी मार्गवर स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.
तर पालखी सोहळा स्वागतासाठी प्रशासनाच्या वतीने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, दौंड पुरंदर चे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या सह बोरिभडकचे सरपंच बाबुराव गजशीव, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रंजना कुल, भाजपच्या नेत्या कांचन कुल, वासुदेव काळे, विकास शेलार, माऊली ताकवणे, विकास शेलार, तुकाराम ताकवणे, राष्ट्रवादीचे नेते गणेश थोरात, वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार, राणी शेळके, विकास खळदकर, नितीन दोरगे इ मान्यवर उपस्थित होते.
पालखी सोहळ्याला हवेली तालुक्यातुन निरोप देण्यासाठी हवेली तहसीलदार तृप्ती कोलते व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शुक्रवारी रात्रीचा लोणी काळभोर येथील मुक्काम आटोपून शनिवारी तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथील दुपारच्या विसाव्यासाठी दाखल झाला होता. त्यांनतर सायंकाळी 4:30 वाजता पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यात प्रवेश केला.