कराड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीचे गुलाम झाले आहेत. ईडीला घाबरून ते पळाले आहेत. अशा पळपुट्या मुख्यमंत्र्यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. ईडीला घाबरून पळालेल्या लफंग्यांचे नेतृत्व करणार्या सरदाराची शिवसेना होऊ शकत नाही, अशी बोचरी टीका खा. संजय राऊत यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे इंद्रजित गुजर, हर्षल कदम उपस्थित होते.
खा. राऊत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, मुख्यमंत्र्यांना काय एवढे गांभीर्याने घ्यायचे? दिल्लीचा गुलाम माणूस आहे तो. त्यांची दीड वर्षे दिल्लीत मुजरा झाडण्यात गेली. महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान, बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, आचरण त्यांच्याकडे आहे काय? ते काय आम्हाला सांगणार. सत्तेसाठी हपापलेले लोक आहेत ते. ईडीला घाबरून पळाले आहेत. आम्ही तसे नाही. आम्ही लढू आणि तुम्हाला गाढू.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारामध्ये महायुतीचा मेळावा घेतल्याबद्दल विचारले असता खा. राऊत म्हणाले, उदयनराजे महायुतीचे नेते आहेत. त्याबद्दल मी काय बोलणार. ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाशी त्यांनी इमान राखले पाहिजे. 2024 सुरू झाले आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा त्यांना कळेल सत्य काय आहे ते. यातील एकही आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाही, लिहून ठेवा असे भाकीतही राऊत यांनी केले.
मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खा. राऊत म्हणाले, कोण दादा भुसे? आता तुमची मान वाकडी होण्याची वेळ आली आहे. आम्ही ताठ मानेचे लोक आहोत. शिवसेना ही ताठ मानेने जगणारी सेना आहे. लफंग्यांच्या टोळीची सरदारकी करणार्यांची नाही. देशातील सर्व घटनात्मक संस्थावर दबाव आहे. त्या विकत घेतल्या गेल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष विकत घेतला गेला आहे. मग न्याय मागायचा कोणाकडे असा सवालही खा. राऊत यांनी उपस्थित केला.
मंत्री शंभूराज देसाई यांच्याबाबत बोलताना खा.राऊत म्हणाले, शंभूराज देसाई यांनी आपल्या आजोबांचा इतिहास वाचावा. ते न्यायप्रिय नेते होते. आपण काय करतो आहोत ते समजून घ्यावे. बाळासाहेब देसाई यांचा आदर्श आम्ही बाळगतो. बाळासाहेब ठाकरे यांना बाळासाहेब देसाई यांच्या विषयी खूप प्रेम आणि आदर होता. शंभूराज देसाई यांनी आपल्या आजोबांचे चरित्र वाचावे. त्यांच्याकडे नसेल तर मी त्यांना पाठवेन.