Latest

सांगली: आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत पृथ्वी बर्वेचा डबल धमाका

अविनाश सुतार

विटा : पुढारी वृत्तसेवा : आयटीटीएफ पॅरा इंटरनॅशनल एफ-४० पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत विट्याच्या पृथ्वी बर्वेने महिला एकेरी सामन्यात कांस्य आणि मिश्र दुहेरी सामन्यात रौप्यपदक पटकावले. ही स्पर्धा थायलंड मधील पट्टाया येथे १८ ते २१ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व सांगली जिल्ह्यातील विटा येथील पृथ्वी बर्वेने केले. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत टर्कीच्या यू एर्तीस कडून पृथ्वीला ०-३ अशी मात मिळाली. त्या नंतर पुढील सामन्यात पृथ्वीने यशस्वी कामगिरी करत थायलंडच्या जनीसा खोमपास्तला ३-० असा हरवलं. उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तान च्या एलदाना बदुओवावर ११-४, ११-७, ११-८ अशी सरळ सेट्स मध्ये मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत चायनीज तायपैच्या लिन-त्सु-यू या स्पर्धकाकडून पराभव झाल्यामुळे या स्पर्धेत तिला कांस्य पदकावर समाधाव मानावे लागले.

पृथ्वी क्लास ९ ची स्पर्धक आहे. ती या स्पर्धेतील सर्वात लहान आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय सिड शिवाय किंवा कोणत्याही मानांकनाशिवाय उतरली. पृथ्वी बर्वे हिने पुन्हा एकदा पॅरा टेबल टेनिस स्पर्धेमध्ये दोन पदकं मिळवत इतिहास रचला आहे. मिश्र दुहेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या जगन्नाथ मुखर्जी, पूनम या जोडीचा ११-५, ११-१,११-६ असा सरळ पराभव केला. उपांत्य फेरीत कझाकिस्तान च्या ओराझबेक अजमान, एलदाना बदुओवा या जोडीबरोबर झालेल्या ५ सेट च्या रोमहर्षक सामन्यात  ७-११, ११-६, ९-११, ११-७ आणि ११-५ असा विजय मिळवत मिश्र दुहेरी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

फायनलमध्ये वांगफोनफाथाना सिरी फिसिट, सुआंग-थो सुमाली या थायलंडच्या अनुभवी जोडीकडून अत्यंत चुरशीच्या सामन्यात पृथ्वी बर्वे आणि कुणाल अरोरा या जोडीला रौप्यपदक मिळाले. या अंतिम मिश्र दुहेरी सामन्यात महाराष्ट्राची पृथ्वी बर्वे आणि दिल्लीचा कुणाल अरोरा अशी जोडी होती.

नुकत्याच मे २०२२ मध्ये जॉर्डन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेमध्ये पृथ्वीने पदार्पणातच सुवर्ण पदक मिळविले होते. तसेच फेब्रुवारी २०२० आणि २०२१ च्या राष्ट्रीय स्पर्धेत पृथ्वीने क्लास नाईन गटात रौप्य पदक पटकावले. गेली तीन वर्षे ती पुण्याच्या शारदा सेंटर येथे प्रशिक्षक दीप्ती चाफेकर आणि सुरेंद्र देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. पुण्याच्या फर्ग्युसन मध्ये शिकणाऱ्या पृथ्वीने सातारा येथे ललित सातघरे यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आहे. पृथ्वीच्या सातत्यपूर्ण कामगिरीने तिच्या यशाचे संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT