नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी, यासाठी माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ, राष्ट्रीय आघाडी समितीचे अध्यक्ष मुकुल वासनिक यांची दिल्लीत भेट घेतली. शिवसेना ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. याउपर या जागेवरील तिढा अजूनही सुटलेला नाही. कुठल्याही परिस्थितीत सांगली लोकसभा लढवायचीच, अशा भूमिकेत काँग्रेस पक्ष आहे. वेळ पडल्यास मैत्रीपूर्ण लढतीचीही तयारी काँग्रेसकडून आहे. महाविकास आघाडीतील सांगलीच्या जागेचे वादंग विरलेले नाही.
आमची भूमिका कळवली आहे. पक्ष नेतृत्व आमच्या भूमिकेचा आणि भावनेचा विचार करेल, अशी अपेक्षा आहे. अखेरच्या क्षणी मैत्रीपूर्ण लढत करायची झाली, तरी त्यासाठी आमची तयारी आहे. पक्ष आदेश देईल, त्या पद्धतीने पुढे जाऊ, असे विश्वजित कदम म्हणाले. हे सांगताना सांगलीच्या जागेवरील दावा कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, वेळ आली तर शिवसेना ठाकरे गटाला आव्हान देण्याची तयारी आहे, असे सूतोवाचही विश्वजित कदम यांनी केले.
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरेंनी आपल्या सतरा जागांवरील उमेदवार जाहीर केले. त्यात सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीत आधीच सांगलीच्या जागेवरून वाद असताना शिवसेनेने एकतर्फी उमेदवारी घोषित केली. त्यामुळे काँग्रेसमधून बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही नाराजी व्यक्त केली.
चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच विश्वजित कदम यांनी दिल्ली गाठली आणि काँग्रेस नेत्यांकडे आपले गार्हाणे मांडले. विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेवरील विषय सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापर्यंतही पोहोचवला. यावेळी विश्वजित कदम यांच्यासह विशाल पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
खर्गे यांच्याशी भेटीनंतर कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. कदम म्हणाले की, सांगलीसंदर्भात आम्ही खर्गे, वेणुगोपाळ, मुकुल वासनिक यांची भेट घेतली आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवल्या आहेत. 1947 पासून ते 2014 पर्यंत काँग्रेस पक्षाने सांगलीची जागा लढवली आहे. सांगली लोकसभेचे वातावरण काँग्रेसमय आहे. त्यामुळे सांगली लोकसभेतून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही आग्रही आहोत.