सांगली जिल्ह्यात ड्रग्जचे उत्पादन आणि साठा होतो आहे. तरुणाई या व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. सांगलीसारख्या निमशहरी भागात दारूनंतर ड्रग्जचे रॅकेट सतत ही येणार्या भयावह संकटाची चाहूल आहे. हे वेळीच रोखण्याची गरज आहे. अन्यथा येणार्या चार-पाच वर्षात सांगली जिल्ह्यातील तरुणाई या व्यसनात गुरफटून पूर्णत: बरबाद होण्याचा धोका आहे.
शासन ड्रग्जविरोधी खंबीर पावले उचलत नाही. ड्रग्जबाबतची धोरणेही कुचकामी आहेत. फक्त ड्रग्जचा साठा शोधणे आणि तो पकडणे यालाच कारवाई म्हणतात का? यासोबत तरुण आणि भरकटलेल्या व्यक्तींचे मानसिक पुनर्वसनही अत्यंत महत्त्वाचे. यासाठी अत्यावश्यक आहे समुपदेशन.
-डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचारतज्ज्ञ, सांगली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ड्रग्ज निर्मिती ही अतिशय गंभीर बाब. ड्रग्ज सहज उपलब्ध होण्यामुळे व्यसनाधिनता वाढते. प्रश्न असा आहे की, असे ड्रग्ज सापडल्यावर संबंधितांवर किती कठोर कारवाई होते? कठोर कारवाई, कठोर शिक्षा झाल्याशिवाय ड्रग्ज व्यवहारातील साखळी बंद होणार नाही. त्यासाठी यंत्रणेने मनापासून ताकदीने प्रयत्न करावेत.
– डॉ. मधुरा किल्लेदार,
अध्यक्षा, आयएमए, सांगली.
असुरक्षिततेची भावना आणि आव्हाने पेलता येणार नाहीत हा न्यूनगंड तरुणांना व्यसनाधीन करत आहे. योग्य-अयोग्याचे भान नसल्याने अनेकदा आकर्षणातून युवक व्यसनाकडे वळतात. नैराश्य, एकतर्फी प्रेम, नकार पचवता न येणे, यामुळे व्यसनाधिनता वाढते. त्याला चित्रपट, सोशल मीडियावर व्यसनाबाबत होणारे उदात्तीकरण बळ देते. या जाळ्यात मुलीही अडकत आहेत. अनेक घटनांवरून असे स्पष्ट होते की, व्यसनासाठीच्या साधनांची उपलब्धता सहज आहे. यावर उपाय म्हणजे पालक-मुलांमधील संवाद. तो असेल तर मुलांच्या वर्तणुकीतील बदल लगेच लक्षात येतील आणि मुलाला योग्यवेळी सावरता येईल.
– पूनम गायकवाड, मानसोपचार तज्ज्ञ, सांगली.
ड्रग्ज आधीपासूनच जिल्ह्यात मिळत होते, परंतु आता ते उघडकीस येत आहे, इतकेच. सांगलीतील ठराविक ठिकाणे ड्रग्जचे अड्डे आहेत. पोलिसांनी त्यावर करडी नजर ठेवावी. तसेच महाविद्यालयीन व्यवस्थापनाने कडक शिस्तीचा अंमल करावा. पालकांनी मुलांच्या वर्तनाकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. महाविद्यालयांनी समुपदेशक नेमावेत. व्यसनाधीन मुले सापडली, तर त्यांचे वेळीच समुपदेशन करून त्यांना विळख्यातून बाहेर काढता येईल.
– अर्चना मुळे, समुपदेशक , सांगली