संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या ९९ उमेदवारी अर्जांपैकी थोरात आणि विखे या दोन्ही गटातील तब्बल ५४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता १८ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत. या वेळी प्रथमच काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या गटाच्या विरोधात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गट निवडणूक रिंगणात अधिकृत पॅनल करून उतरला आहे. त्यामुळे आता आजी-माजी मंत्र्यांच्या गटात खऱ्या अर्थाने दुरंगी लढत होणार आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळासाठी २८ एप्रिल २०२३ ला मतदान होत आहे. या निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कृषी पदवीधर मतदारसंघातील सर्वसाधारण महिला राखीव, इतर मागास प्रवर्ग विमुक्त भटक्या जाती जमाती या प्रवर्गातील छाननी नंतर ५८ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. त्यापैकी ३२ जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले आहेत. त्यामुळे आता २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती, दुर्बल घटक या प्रवर्गातून २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १२ जणांनी माघार घेतली. त्यामुळे १० उमेदवार निवडणूक लढणार आहात. व्यापारी- आडते मतदारसंघातून १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ९ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता ६ उमेदवार निवडणूक आहेत. तर हमाली माथाडी मतदारसंघातून ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी १ जणाने माघार घेतली असल्यामुळे ३ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.