Latest

सांगली : विजय ताड हत्या प्रकरण : ‘शूटर्स’ गळाला…‘सुपारी’बहाद्दर मोकाटच!

दिनेश चोरगे

सांगली; सचिन लाड : विजय ताड…भाजपचे माजी नगरसेवक…दिवसाढवळ्या धडाधड गोळ्या झाडून त्यांची हत्या…पंधरा दिवस उलटून गेले तरीही मुख्य संशयित भाजपचा विद्यमान नगरसेवक उमेश सावंत पोलिसांच्या हाताला लागत नाही, ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. गोळ्या झाडणारे 'शूटर्स' हाती लागले; मात्र ताड यांची 'गेम' करण्यासाठी 'सुपारी' देणारा बहाद्दर अजूनही पोलिसांना चकवा देत फरारीच आहे.

'शूटर्स' तरबेज!

दि. 17 मार्च रोजी जत-सांगोला या राष्ट्रीय महामार्गापासून दोनशे मीटर अंतरावर दुपारी दोन वाजता ताड यांची हत्या झाली. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येने जिल्हा हादरला. गोळ्या झाडणारे 'शुटर्स' अलगत सापडले. अजूनही ते पोलिसांच्या कोठडीत आहेत. यासाठी 'शुटर्स'ना 75 लाख रुपयांची 'सुपारी' दिल्याची माहिती पोलिस तपासातून उजेडात आली आहे. यासंदर्भात त्यांना काही ठोस पुरावेही मिळाले आहेत. ताड यांचा खून 'नाजूक' संबंधातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच काही पुरावेही मिळाले आहेत. पण जोपर्यंत सावंत सापडत नाही, तोपर्यंत पोलिसांनी तोंडावर बोट ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गोळ्या घालून दगड घातला!

घटनास्थळी गोळ्या झाडलेल्या तीन पुंगळ्या सापडल्या आहेत. तीन गोळ्या धडाधड घातल्याने ताड काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडले. ते तडफडत असताना एका हल्लेखोराने त्यांच्या डोक्यात दगड घातला. ते मृत झाल्याची खात्री पटल्याने हल्लेखोर पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात असल्याने सावंत यांची लवकर ओळख पटली नव्हती.

बबलूने घेतली सुपारी

अटकेत असलेला बबलू चव्हाण यानेच ताड यांचा खून करण्यासाठी 'सुपारी' घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. ताड यांची हत्या करण्यापूर्वी तब्बल दीड महिना त्याने स्वत:चा मोबाईल बंद ठेवला होता, अशी माहितीही पोलिस तपासातून पुढे आली आहे. यावरून ताड यांची हत्या ही पूर्वनियोजित कट होता, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाईल 'फ्लाईट' मोडवर

घटनास्थळी पोलिसांना एक मोबाईल सापडला. पण त्यावेळी हा मोबाईल 'फ्लाईट' मोडवर होता. पोलिसांनी फ्लाईट मोड काढल्यानंतर हा मोबाईल अटकेत असलेल्या आकाश व्हनखंडे याचा असल्याचे निष्पन्न झाले. जरी पोलिसांनी आपल्याला पकडले तर लोकेशन मिळू नये, यासाठी त्याने मोबाईल 'फ्लाईट' मोडवर ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे.

'सुपारी' फुटली कुठे?

ताड यांच्या खुनासाठी 75 लाखाची 'सुपारी' घेतल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे येत आहे. ही सुपारी फुटली कुठे? यासाठी कुठे बैठक झाली? रिव्हॉल्व्हरची जुळवा-जुळव केली कुठे? हल्लेखोरांना पैसे मिळाले का? या सार्‍या बाबींचा तपासातून उलगडा करण्याचे काम सुरू आहे.

'एलसीबी'चा जत तालुक्यात मुक्कामच!

ताड यांचा खून झाल्यापासून स्थानिक गुन्हे अन्वेषणची (एलसीबी) टीम जत तालुक्यात आहेत. या 'टीम'मध्ये चार पथके करण्यात आली आहेत. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पथकाने संपूर्ण तालुका पिंजून काढला. मात्र तरीही सावंतचे कुठेच 'दर्शन' झालेले नाही. जिल्ह्याबाहेर जाऊनही या पथकांनी छापे टाकले. तरीही सावंतचा सुगावा लागलेला नाही. मात्र पथकांनी अजून हार मानलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT