नागपूर : पुढारी वृत्तसेवा भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या नेत्या सना खान यांचा मृतदेह सापडलेला नसताना हे प्रकरण नव्या वळणावर आले आहे. मुख्य आरोपीवर नवनवीन कलमांचा घट्ट फास पोलिस आवळत आहेत. सनाचा वापर वाममार्गासाठी केला गेल्याचे हळूहळू समोर येत चालले आहे. त्यामुळे यासंबंधीच्या चित्रफितीतूनच आता अनेक गौप्यस्फोट होणार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सनाच्या हत्येचा आरोप असलेला आणि तिचा तथाकथित पती अमित ऊर्फ पप्पू साहू हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक राजकीय नेत्यांकडे आणि पदाधिकार्यांकडे तिला अनैतिक कामासाठी पाठवत होता. याच्या चित्रफिती आणि अश्लील छायाचित्रे काढून त्याचा वापर तो स्वतःच्या स्वार्थासाठी करीत होता. आतापर्यंत पोलिसांनी साहू आणि अन्य दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत 22 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. जबलपूर (मध्य प्रदेश) येथून 8 संशयितांना आणि नागपुरातून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. सनाच्या माध्यमातून या टोळीने कोट्यवधींची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. साहूनेच सनाला गैरमार्गाला लावल्याचा आरोप करणारी तक्रार सनाच्या आईने रविवारी दाखल केल्यानंतर ही धक्कादायक माहिती पोलिस सूत्रांकडून पुढे आली आहे.
सना मार्च 2021 पासून अमितच्या संपर्कात असून आधी तिला विश्वासात घेतल्यानंतर दोघांचे हॉटेल, ढाबा उघडण्यासाठी व्यावसायिक संबंध बळावले. पुढे त्यांनी लग्नही केले. मात्र, नंतर तिला सातत्याने धाक दाखवून साहू तिच्याकडून लाखो रुपये उकळत होता, या आरोपाखाली मानकापूर पोलिस स्थानकात आणखी एक गुन्हा नव्याने दाखल करण्यात आला आहे. यामुळे सना खान हत्याकांडाने धक्कादायक वळण घेतले असून त्यामुळे राजकीय क्षेत्रातही लवकरच मोठा भूकंप येणार असल्याचे बोलले जात आहे.