संपादकीय

सुरीनाम : दक्षिण अमेरिकेतला भारताचा नवा मित्र

दिनेश चोरगे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सुरीनाम या भारतीयांच्या द़ृष्टीने अपरिचित अशा देशाचा दौरा नुकताच पार पडला. सुरीनाम हा देश अटलांटिक सागरामध्ये दक्षिण अमेरिकेच्या प्रभाव क्षेत्रात येतो. हे बेट भारतापासून तसे किती तरी लांब आहे. परंतु, या देशात सुमारे 17 ते 22 टक्के लोक हिंदू आहेत. भारतीय संस्कृतीचा या बेटावर चांगलाच पगडा आहे. भारत 'जी-20'चा सदस्य झाल्यानंतर तेथील अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी हे भारतात येऊन गेले आणि त्यांनी आपल्या राष्ट्रपतींना भेटीचे निमंत्रण दिले. भविष्यात सुमंगल, सुप्रभात घडविणार्‍या या उष्ण कटिबंधातील देशाशी संपर्क करून भारत पश्चिम गोलार्धात आपला एक नवा विश्वासू मित्र तयार करू शकतो.

मध्य युगात आणि आधुनिक युगाच्या प्रारंभी भारतीय लोकांनी व्यापार, उद्योग आणि सांस्कृतिक आदान-प्रदानामध्ये केलेले कार्य एवढे मोठे आहे की, ते समजून घेण्यास आपण अपुरे पडतो की काय, असे वाटू लागते. 14 व्या शतकात महाराष्ट्रातून 400 कुटुंबे युरोपात गेली आणि तिथे स्थिर झाली. आजही ते महाराष्ट्राशी आपले नाते सांगतात. तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूच्या काही भागांतून गेलेल्या 452 भारतीयाचं एक जहाज 5 जून 1873 या दिवशी सुरीनामची राजधानी परमारिबो येथे उतरले. त्याला यंदा 150 वर्षे झाली आहेत. 5 जून रोजी यानिमित्ताने भारतीयांच्या सुरीनाममधील आगमनाचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आणि त्यानिमित्ताने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या समारंभास उपस्थित होत्या. कुठे आहे हा देश? काय आहे त्याचे वैशिष्ट्य? तेथील निसर्ग, पर्यटन आणि खनिज संपत्ती यांचे किती अद्भुत विश्व आहे? याविषयी आपल्याकडे कमालीचे अज्ञान आहे.

सुरीनाम या प्रजासत्ताक देशाचा इतिहास मोठा रंजक आणि उद्बोधक आहे. हे नावच मुळी तेथील एका पारंपरिक वसाहत करणार्‍या एका समुदायावर आधारलेले आहे. तेथे कोणत्याही नदीच्या, सागराच्या नावाच्या मागे 'नाम' असे अक्षर आले की, त्याचा संबंध या देशाच्या संस्कृतीशी जोडला जातो. या देशाच्या उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. पूर्वेला आणि पश्चिमेला फ्रेंच गयामा आहे. या देशाच्या दक्षिणेस ब्राझील हा देश वसलेला आहे. सुमारे 1 लाख 65 हजार चौरस कि.मी.च्या क्षेत्रामध्ये या देशाची भूमी विस्तारली आहे. विरळ लोकवस्ती हे या देशाचे एक वैशिष्ट्य आहे. याचा मानव विकास निर्देशांक उच्च दर्जाचा आहे. खरे तर बहुसांस्कृतिक आणि बहुसामाजिक विकासातून या देशाची संस्कृती घडली आहे. एक काळ असा होता की, या देशावर प्रथम फ्रेंचांंचे आणि नंतर डचांचे प्रभुत्व होते. या दोघांमध्ये युद्धे झाली आणि फ्रेंचांनी काढता पाय घेतला. डचांनी नंतर आपल्या वर्चस्वाचा पगडा तेथे बसविला. आजही या देशाची अधिकृत भाषा ही डच आहे. त्यांचे राष्ट्रगीतसुद्धा डच भाषेतच आहे. शिवाय, या देशात सुमारे 14 वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्यापैकी भारताची हिंदीसुद्धा एक प्रमुख भाषा आहे. येथील बहुसंख्य लोक ख्रिश्चन असले, तरी सुमारे 17 ते 22 टक्के लोक हिंदू आहेत. अभिजात संस्कृतीचे वैशिष्ट्य असे की, आशिया खंडातून या देशामध्ये पोहोचलेल्या मजुरांनी या देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिलेले आहे. बहुतेक लोक हे या देशाच्या उत्तर भागात किनार्‍याजवळ राहतात.

या देशांमध्ये जाण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर मोठे अद्भुत आहे. त्या काळात वृक्षारोपण करण्यासाठी मजुरांची अत्यंत आवश्यकता असे. असे मजूर तेथे त्यांना आफ्रिकेतून मिळत असत. परंतु, त्यापेक्षा ते आशिया खंडातील मजुरांना अधिक पसंत करत. त्यामुळेच भारतामधील मजुुरांनी येथेच स्थलांतर केले आणि त्यांनी आपल्या श्रमनिष्ठा, कार्य संस्कृती याबरोबरच आपली मेहनत यामुळे या देशाच्या जीवनावर चांगलाच पगडा मिळविला. आता चंद्रिका प्रसाद संतोखी हे या देशाचे अध्यक्ष भारतीय वंशाचे आहेत. विषुववृत्ताच्या किनारपट्टीच्या जवळ असल्यामुळे येथे पूर्ण उष्ण वातावरण असते आणि ते भारताच्या वातावरणाची जवळजवळ समीप असल्यामुळे भारतीय लोकांना विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथील लोकांना त्या वातावरणामध्ये किंवा तामिळनाडू येथील लोकांना या वातावरणात राहण्यात कोणतीही अडचण येत नाही. या देशाची अर्थव्यवस्था संपन्न आहे. त्याचे कारण असे की, तेथे ऊस, कापूस, बॉक्साईट आणि सोने यांचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे या प्रदेशात व्यापार समृद्धीला मोठी संधी आहे.

समान सांस्कृतिक संबंध

सुरीनाममध्ये विष्णूचे मंदिर आहे. दिवाकराचे मंदिर आहे. शिवाय, तेथील भारतीय लोक हे आपल्या कला, परंपरा आणि उत्सवांचे चांगल्याप्रकारे पालन करतात. दिवाळीच्या दिवशी तेथे सर्वांना सार्वजनिक सुट्टी असते. सर्वधर्मीय लोक तेथे एकत्र राहतात. त्यामुळे धार्मिक द्वेष आणि संघर्ष हा तेथे घडत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, येथील पेट्रोलियमचे साठे, सोन्याच्या खाणी यामुळे येथे व्यापाराला मोठी संधी आहे. या देशामध्ये ऊस, कापूस, भात, कॉफी, कोको इत्यादींचे उत्पादन होते. कृषी उत्पादनांमध्ये येथील संपन्न नदीकिनारे हे शेतीच्या उत्पादनात फार महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

भावी सहकार्याच्या दिशा

भारत आणि सुरीनाम यांच्यामधील भावी सहकार्याच्या दिशा कोणत्या आहेत? तर आपणास असे लक्षात येते की, या देशाच्या समान सांस्कृतिक इतिहासामुळे पर्यटन हे सगळ्यात महत्त्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात दोन्ही राष्ट्र एकमेकांशी आदान-प्रदान करू शकतात. तेथील संपन्न भौगोलिक परिस्थिती आणि नदी किनारे, निसर्गरम्य स्थळे तसेच जैवविविधता, उंच धबधबे आणि सागरीकिनारे या सर्वांचे आकर्षण पर्यटक म्हणून भारतीयांनासुद्धा असणे शक्य आहे. त्यामुळे या भूमीशी समृद्ध भौगोलीक परिस्थिती, जैवविविधता आणि पर्यटन क्षमता यांचा विचार करता भारताने पर्यटन क्षेत्रातसुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडली पाहिजे. तसेच या प्रदेशातील संस्कृतीचे वेगळेपण हेसुद्धा लक्षणीय आहे. भारतीयांकडून त्यांना बरेच काही शिकता येऊ शकेल. शिवाय, तेथील समाजामध्ये विज्ञान-तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रांतसुद्धा मोठा वाव आहे. त्यामुळे क्रीडा, कला, संस्कृती आणि लोककलांच्या आदान-प्रदानावर भर देऊन आपण समान सांस्कृतिक संबंधाच्या आधारे पुढे वाटचाल केली पाहिजे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तेेथील सरकारच्या वतीने 'द ग्रँड ऑर्डर ऑफद चेन ऑफयलो स्टार' हा सर्वोच्च किताब बहाल करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणार्‍या राष्ट्रपती मुर्मू पहिल्या भारतीय महिला आहेत. आपल्या राष्ट्रपतींनी तेेथे महात्मा गांधींच्या प्रतिमेससुद्धा आदरांजली वाहिली. थोडक्यात काय, तर भारत आणि सुरीनाम या दोन देशांमध्ये मागील 150 वर्षांपासून जे संबंध निर्माण झाले आहेत आणि तेथील समाज जीवनात भारतीयांनी जी विश्वासार्हता निर्माण केली आहे ती पाहता शिक्षण, कृषी, आरोग्य प्रसारमाध्यमे, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांत भावी संपर्काला भरपूर वाव आहे. हे सर्व लक्षात घेता भारत आणि सुरीनाम यांच्यातील संबंधाचा एक नवा अध्याय या भेटीमुळे सुरू होणार आहे.

– प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

SCROLL FOR NEXT