संपादकीय

संत गाडगेबाबा : स्वच्छता अभियानाचे अध्वर्यू

Arun Patil

स्वातंत्र्यापूर्वी आपल्या समाजात अज्ञान, अनारोग्य आणि अंधश्रद्धांचा अंधार पसरला होता. तेव्हा 1 फेब्रुवारी 1905 रोजी आपल्या हातात खराटा घेऊन सार्वजनिक स्वच्छतेसाठी गाडगेबाबा पुढे सरसावले. आज संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त…

आपल्या हाती खराटा घेऊन रस्ते, मोटारस्थानक, रेल्वे स्टेशन, गुरांचे गोठे, तुंबलेली गटारे, अधिवेशनाचे आवार, मंदिरांचे पटांगण आणि मोठमोठ्या शहरांतील हमरस्ते झाडणारे गाडगेबाबा अखंड पन्नास वर्षे सार्वजनिक स्वच्छतेचे काम करत होते. सर्वांच्या सुखासाठी बाबांनी सार्वजनिक स्वच्छतेची चळवळ निर्माण केली होती. एकट्या माणसाचे हे एक स्वच्छता आंदोलनच होते. खरे तर गाडगेबाबा सार्वजनिक स्वच्छता अभियानाचे अध्वर्यू होते.

गाडगेबाबांनी सार्वजनिक स्वच्छता हा एक धर्म म्हणून पत्करला होता. स्वयंप्रेरणेने आणि स्वयंस्फूर्तीने त्यांनी या स्वच्छता कार्यास वाहून घेतले होते. लोकांचे कपडे धुता धुता बाबांनी सार्वजनिक स्वच्छतेतून लोकांची मने स्वच्छ करण्यास प्रारंभ केला. स्वच्छतेचे असे उदात्तीकरण करणारा महाराष्ट्रातील एकमेव संत म्हणजे गाडगेबाबा होय. फैजपूर आणि हरिपूरला काँग्रेस अधिवेशनाचे पटांगण झाडताना महात्मा गांधीजीही साफसफाई करू लागले. लोकांच्या पायाखाली स्वच्छतेची फुले वाहणारा पहिला आराधक होते गाडगेबाबा! स्वच्छतेतून लोकमने सदैव प्रफुल्लित ठेवणारा सेवक होते गाडगेबाबा. आपल्या हाती स्वच्छतेचा टॉर्च घेऊन लोकांच्या पायाखालील रस्ता उजळून टाकणारे प्रेषित होते गाडगेबाबा. स्वच्छता हा बाबांचा सेवाधर्म होता. 'खराटा' हे त्या धर्माचे साधन होते. 'लोकमंगलता' हे त्या धर्माचे साध्य होते. 'श्रम' हे त्या धर्माचे ध्येय होते. 'सातत्य' हा त्या धर्माचा ध्यास होता. 'निरपेक्षता' हा त्या धर्माचा आत्मा होता.

'विनय' हा त्या धर्माचा अलंकार होता. 'सर्वोदय' हे त्या धर्माचे ब्रीदवाक्य होते. अशा या सेवाधर्माचे महामेरू होते गाडगेबाबा. 'खराटा' हाती घेतलेली बाबांची पाच बोटे एक सुंदर महाकाव्य होते. निरक्षर बाबांनी आपल्या हातात 'लेखणी' धरून अभंग रचले नाहीत. 'खराटा' हाती धरून हातांना 'अक्षर' अर्थ प्राप्त करून दिला. बाबांना लेखणीच्या लालित्यापेक्षा खराट्याचे लालित्य अधिक भावले. आपल्या हाती 'खराटा' घेणे म्हणजे खर्‍या अर्थानं श्रमसंस्कृतीचे उदात्तीकरण करणे, लोकजीवनाची मने विशाल करणे आणि लोकमंगलतेची भावना विस्तारणे असे त्यांना वाटत होते.

'सर्वे भूमी भूपालकी' या भक्ती भावनेनेच गाडगेबाबांनी जग झाडण्यास सुरुवात केली. 'जिथे राबती हात तिथे हरी' हा वचननामा पुढे ठेवूनच जग झाडण्यास प्रारंभ केला. आत्मोद्वाराकडून सर्वोद्वाराचा मार्ग प्रशस्त करणे हाच गाडगेबाबांच्या स्वच्छता अभियानाचा महामंत्र होता. बाबांनी श्रमसाधनेतून लोकपूजा आरंभिली होती. 'लोकप्रेम' हीच या लोकपूजेची फुले होती. त्याग, तपस्या आणि अनासक्ती हेच या लोकपूजेतील मंत्र होते. सुख, समाधान आणि सहजीवन हेच या लोकपूजेचे फळ होते. स्वच्छतेच्या माध्यमातून जनमनात प्रेम, बंधुभाव, समता आणि ममता साधणारे महापुरुष होते गाडगेबाबा. बाबांनी जन्मभर सार्वजनिक स्वच्छतेचे काम केले. त्यांचे हे एक अभूतपूर्व 'स्वच्छता मिशन' होते. तेथे 'कमिशन' नव्हते. पगार नव्हता. बढती नव्हती.

वृत्तपत्रांत प्रसिद्धी नव्हती. स्वच्छता हाच एक 'परम धर्म' वाटत होता बाबांना! त्यामुळेच त्यांचा 'खराटा' विषमतेकडून समतेकडे, विसंवादाकडून संवादाकडे, जडतेकडून चैतन्याकडे, विघातकाकडून विधायकाकडे, विनाशाकडून विकासाकडे, नैराश्याकडून आनंदाकडे आणि द्वैताकडून अद्वैताकडे घेऊन जाणारे एक सबल साधन होते. त्यांचा खराटा स्वच्छता संस्काराचा सुप्रभ आविष्कार होता. म्हणूनच त्यांनी स्वच्छता हा आपल्या जीवनाचा धर्म मानला होता. कारण त्यात लोकहित होते. 'स्वच्छता' हाच आपला खरा यज्ञ मानला होता. कारण त्यात सामाजिक आरोग्याचे रक्षण होते. 'स्वच्छता' हाच आपला जीवन ध्यास मानला होता. कारण, त्यात सामाजिक सुखाचे रहस्य लपले होते.

संत गाडगेबाबा हेच आपल्या देशातील स्वच्छता अभियानाचे अध्वर्यू होते. स्वच्छता संस्कृतीचे जनक होते. स्वच्छता अभियानाचे फिरते विद्यापीठ होते.

– प्राचार्य रा. तु. भगत
अध्यक्ष, संत गाडगे महाराज अध्यासन, कोल्हापूर

SCROLL FOR NEXT