संपादकीय

शेजारधर्म!

अमृता चौगुले

काय मिश्टर? एवढे घाईघाईत कुठे चाललात? कसली एवढी गडबड?
आमचं काही नाही हो. शेजार्‍यांकडे धुमाकूळ चाललाय.
काय झालं?

रात्री कोणीतरी डाका घालायचा प्रयत्न केला. त्यांच्या घरातले सगळे सिनेमाला गेले होते, तेवढ्यात चोरांनी साधलं.
खूप नुकसान झालंय?
अजून कळायचंय, नक्की किती नुकसान झालं ते. पण, घरात सगळे नर्व्हस झालेत. बायका रडताहेत. पुरुष ठिकठिकाणची मदत घ्यायला बघताहेत.
आणि तुम्ही?

त्यांना मदत करायलाच बाहेर पडलोय ना! बाहेरून खाण्या-पिण्याच्या गोष्टी आणून देतो त्यांना. तेवढेच जरा बाहेर पडतील ते धक्क्यातून. शेवटी आम्ही सहा बिर्‍हाडं आमच्या बिल्डिंगमध्ये. शेजारधर्म अशी काही चीज आहे की नाही?
खरंय हो. शेजार्‍यांकडे एवढी अस्वस्थता माजली असली की, बघवत नाही अगदी. जमेल तशी मदत करावीशी वाटते. वेळप्रसंगी तेही आपल्याला करतातच की मदत.

हे झालं आपल्या घरगुतीपैकी; पण आज आपले देशाचे शेजारीपण नाना संकटांमध्येच आहेत बरं का! इकडे पाकिस्तान, तिकडे नेपाळ, झालंच तर श्रीलंका!
काय हो? श्रीलंकेने डायरेक्ट दिवाळखोरी जाहीर केली? हे म्हणजे बेश्टच की! कर्जं फेडायचं जीवावर आलं की, दिवाळखोरी जाहीर करून मोकळं व्हायचं. चला, आपण सगळेच एकेक करून दिवाळखोरी जाहीर करून टाकूया. मजेत कर्जंबिर्जं उचलायची, चैन करायची; पण ती परत फेडायची वेळ आली की, दिवाळखोरी जाहीर करायची. सोप्पंय की!
अहो, एवढं सोपं नाही ते. अशाने पुन्हा कोणी कर्ज देईल का तुम्हाला? काय पत उरेल तुमची जगात?
असं म्हणता?

मग हो? अशा अडचणीतल्या श्रीलंकेसाठी आपल्याला थोडी-फार मदत करावीच लागणार. तसे आता त्यांच्या राजपक्षे कुटुंबाचे जराजरा डोळे उघडताहेत. त्यामानाने पाकिस्तानात अजूनही कशाची धड घडीच बसत नाहीये.
ते तर अधूनमधून अध्यक्ष, पंतप्रधान, न्यायालय वगैरेंमध्ये बराच विचारविनिमय करतात की!
करतात ढीग.. पण, उपयोग काय? क्षणात कुठलाही लष्करशहा त्यात काहीही फेरफार करून टाकू शकतो.
यंदातरी काश्मीरला जाता येईल, असं वाटलं होतं हो. दरवर्षी तसा विचार करतो; पण तिथे सालोसाल आपली अशांतता असते ती असतेच.
काय करणार? त्याच्या पल्याडच्या धर्मांध तालिबानी सत्ता मागे सरायचं नावच घेत नाहीत. त्यांच्या भीतीपोटी काश्मीरचं पर्यटन थांबलं तसंच थोडंसं नेपाळचंही झालंच आहे की! टूरिझमला खीळ, आर्थिक डबघाई!
करताकरता सगळ्याच शेजार्‍यांचे गाडे अडखळत चाललेत म्हणा की!

तसंच थोडंसं. झालंच तर भूतानलाही सांभाळायला हवंय, बांगलादेशाशी सख्य राखायला हवंय. चीन कधी काय उपद्रव करेल, हे सांगता येत नाहीये ते आणि वेगळंच.
या सगळ्यांमध्ये आपलंच त्यातल्या त्यात बरं चाललंय म्हणायचं का मग?
हो. पण तुम्ही कसे, एका बिल्डिंगमध्ये सहाच शेजारी? तसेच आपणही भारतीय उपखंडात सहा-सातच देश आहोत एकमेकांच्या शेजाराला. एक अस्वस्थ असला की, इतरांना झळ लागणारच. शेजारधर्म पाळायची अपेक्षा असणारच!
मग, यावर आपण काय करायला हवंय तुमच्या मते?
कोरोनाची खीळ, वीजपुरवठा संकटात, उष्णतेच्या लाटा, यांचा भरपूर ताप आहेच आपल्याला; पण निदान आपापसात तरी सलोख्याने राहायचा प्रयत्न करूया आपण. आपण धड राहू तरच शेजारधर्म पाळू शकू नाही का?

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT