हे काय हो चिरंजीव? आज असे लंगडीसारखा एक पाय दुमडून का उभे आहात?माझ्यावर अन्याय झालाय, त्याचा निषेध करतोय.
निषेध कर रे खुशाल; पण अन्याय कसला ते तरी सांगशील?
परवा तुम्ही मला नवा फोन घ्यायला नाही म्हणालात.
अरे, आधीचा फोन घेऊन घेऊन जेमतेम साताठ महिनेच झालेत रे. सारखे फोनच्या डोंबलावर घालण्याइतके जादा पैसे नसतात आपल्याकडे पण जुना डबडा फोन वापरल्याबद्दल मित्रांमध्ये आमची इज्जत जाते तिचं काय? म्हणून निषेध.
हा असा? कबूल आहे, नवा फोन विकत घ्यायला तू नेहमी एका पायावर तयार असतोस; पण म्हणून असं घरात एक पाय दुमडून उभं राहाणार? कसं दिसेल ते?
बघा, असं काहीतरी वेगळं केलं म्हणून 'दिसलं' ना तुम्हाला? आता निषेधाचे असेच प्रकार करावे लागणार. नुसतं उपोषण आता फार डाऊन मार्केट वाटतं बाबा.
हो रे, आता कोणी त्याची चेष्टासुद्धा करत नाही.
त्यापेक्षा चहा पार्टीचं आमंत्रण तर घ्यायचं आणि जाम कोणी तिथे जायचंच नाही, हे नजरेत भरतं की नाही?
बच्चू, शंभर कप चहा, खारी वाया जातं ना रे अशाने.
तरी पण फुटेज मिळतो. बच्चूवरून आठवलं. रस्ता बांधकामात पैसे खाल्ले असं कोणीतरी म्हटल्यावर सरळ आपणच आपले हात तोडून घेण्याची धमकी दिली की त्यांनी. सगळे चाट पडले.
त्यांनी असं नवंनवं शिक्षण समाजाला द्यायलाच पाहिजे. शिक्षण राज्यमंत्री नाहीत का ते?
आधी एकदा निषेधासाठी शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारावरून कोणाच्या तरी पुतळ्याचा कडेलोटपण झालेला ना बाबा?
हो, वाचलेलं आठवतंय असं काहीतरी; पण तुझ्यासारखं एवढं लक्षात नाही ठेवलं मी. कारण माझ्यावरचे अन्याय वाढत चाललेत तुमचे.
काय सांगतोस? अन्याय? आणि तुझ्यावर? माझ्या जीवावर रात्रंदिवस नुसता टाईमपास करतोस शहाण्या आणि वर कांगावा करतोस?
बहुतेक निषेध कांगाव्यातूनच येतात बाबा. दबून राहिलो तर लोक आणखी चेचतील. म्हणून पहिलेच मोठ्ठा आवाज, अॅक्शन लावायची. अशी आयडिया असते.
अच्छा! म्हणून तू असं लंगडं उभं राहायची आयडियाची कल्पना काढलीस का?
तसं समजा.
हे बघ, यामुळे तुझा पाय सुजला, दुखला तर डॉक्टरकडे जाण्यासाठी मी तुला दिडक्या देणार नाही.
तुमच्या तळहाताला डिंक लावलाय देवाने. तुमच्या हाताला नोटा फक्त चिकटून राहणार, पुढे सरकणार नाहीत, असं आई नेहमी म्हणतेच. ते सोडा. पण अशा आयडियाबाज निषेधाकडे लक्ष तर द्याल की नाही?
काय दिवस आलेत रे. पूर्वी कसं, कोणी कोणाचा कसा निषेध करावा याचे काही दंडक होते, आता मुळी कोणाला कशाचा विधिनिषेधच राहिला नाहीये. हे काय? आता तू मला वेडावतोयस?
एवढा लो बजेट होणार नाहीये मी. मी फक्त मध्येमध्ये जीभ तिरकी बाहेर काढायची प्रॅक्टिस करतोय.
का एवढा त्रास बिचार्या जिभेला?
आईनं जेवणात नेमकी माझी नावडती भाजी केली की, तिचा असा निषेध करायचा म्हणतोय. कशी आहे आयडिया बाबा?
– झटका