संपादकीय

लवंगी मिरची : ह्याप्पी व्हॅलेंटटाईन डे!

backup backup

आज सकाळी म्या आमच्या खटल्याला म्हंजे तुमच्या भाषेत मिसेसला म्हनलं, आय लव यू. एकदम लाजायला लागली. आता मला सांगा मंडळी, आपल्याच बायकोला आय लव यू म्हणायला कशाची आलीय भीती? पार लाजून चुर झाली आन लगबगीनं घरात निघून गेली. लेकरं तिकडं झाडाखाली ईटी-दांडू खेळत बसले होते.

घरात गेलो तर बायकूनं पदरात तोंड झाकून घेतलं होतं. म्हनली, आय बी लव यू, पन आज काय इशेष? मी म्हटलो, अगं आज व्हॅलेंटटाईन डे आहे म्हणून आन त्याच्या नियमाप्रमाने आज म्हनावेच लागते का आय लव्ह यू म्हनून. म्हंजे आमचा बायकांचा जसा वट सावित्रीचा सण असतो तसा तुमचा पुरुषांचा सण असतो का ह्यो कोनता म्हंत्यात त्यो डे? पन मग मी विचार केला, समजा नाही म्हणलं आपन आपल्या बायकोला आय लव यू तर काही बिघडते का? आणि पुन्हा व्हॅलेंटाईन डे लाच का म्हणायचं? कोणाची भीती आहे का?

दोन हजार मानसं समोर साक्षीला ठेवून आपलं बोहोल्यावर लगीन लागलं, तवा आभाळातून देव पण आले होते आशीर्वाद द्यायला. लगीन झालेल्या बायकोला आय लव यू म्हणायचं लफडं नवच हाये . व्हॅलेंटटाईन डे ला कुनी पण उठून कुनाला पण आय लव यू म्हनू शकते, तर आपण बायकोला तसं का नाही म्हणायचं? पन काहीही म्हना राजेहो, आपन जवान होतो तवा अशी काही सिस्टीम नव्हती याचं लय म्हंजे लयच वाईट वाटतं कवा कवा. म्हंजे व्हायचं असं की, घरातले वडीलधारी मानसं पोरगी बघायला जायचे आणि त्याच्यातल्या एखाद्या म्हातार्‍याला, समजा आमच्या घरात आमच्या आजोबाला पोरगी पटली, सोयरे पटले का तिथेच तो सांगायचा, तुमची लेक आमची सून झाली समजा. अरे, पन आपल्या घरातल्या ज्या पोराला बायको आनताय, ज्याच्याशी तिचं लग्न लावताय त्याला एकदा तरी दाखवा की? पन अजिबात नाही. त्या नव्या नवरीला पण माहीत नसायचं का आपला नवरा कसा आहे? काळा का गोरा, उंच का बुटका ते. घरच्यांनी लग्न लावून दिलं का नीट जिंदगीभर संसार करायचा.

आता ते नवीन कोणतं प्रेम आलं आहे आजच्या जमान्यात, आपल्याला तर समजतच नाही. पहिले दोन-तीन वर्षं सोबत राहतात म्हने, म्हंजे ते काय ते लिव्ह इन रिलेशनशिप. म्हंजे एकमेकाची टेस्टिंग करायची, जमतंय का ते बघायचं आन त्याच्यानंतर ठरवायचं लगीन करायचं का नाही ते. अशा सिस्टीम ने गेलं, तर शपथ सांगतो, आपल्या देशात एक बी संसार नीट चालला नसता. आता लगीन झाल्यावर काय वाजत नाही का कुणाचं एकमेकात? भांडण होत राहतेत, वाद होत राहतेत; पन संसार सुरळीत चालू राहतो ना. चार-पाच वर्षे होईपर्यंत दोन-तीन लेकरं बाळं होतेत, पुन्हा त्यानलाच मोठे करन्यामध्ये जिंदगी जाती. आता हे व्हॅलेंटटाईन डे सारखे प्रकार आल्यापासून पोरगी पोरगं एकमेकांना बघायचे आन हो म्हणायचं कामच नाही.

माझ्या स्वतःच्या लग्नाला वीस वर्षे झाली, मोडला का एक तरी संसार? कारन सांगायचं म्हणजे, आम्ही कोणीबी व्हॅलेंटटाईन डे साजरा केलेला नाही. प्रेम म्हणजे प्रेम आसतं, सांगितलं असो का नसो; पण असतेच की. आता माझं तुम्हाला सांगतो आपले चार बी विक पॉईंट हायेत. बारदाना, बी-बियाणे, बैलं आणि बायको. हे चार बी आपल्या संगट असले तर आपण कोणाला बी भेत नाही. आता तुम्ही म्हणसाल शेतकरी माणूस बायकोवर प्रेम करत नाही का? मग तो व्हॅलेंटटाईन डे का साजरा करत नाही? त्याचं आसय दोस्त हो का, आम्हा शेतकरी माणसाचा आमच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर जीव असतो, प्रेम असतं.

  • झटका 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT