अरे, या खोलीतला दिवा का जळतोय?
बंद करतो बाबा!
आणि बाहेरचा पंखा कोणासाठी ठेवलाय? व्हरांड्यात कोणी नाहीये, मग काय भिंती गार करायच्या आहेत?
पकवू नका बाबा! पाच-सात मिनिटांसाठी आत-बाहेर केलं की, दरवेळेला दिवे, पंखे बंद करणं होत नाही.
बटणं दाबूनदाबून हात दुखत असतील ना? वाटल्यास मी चेपून देऊ का?
एवढे उपकार नकोत पिताश्री, फक्त सारखं आमच्या मागे लागू नका वीज वापरावरून.
का? तुम्हाला फुकट मिळते ती?
जाऊ द्या हो. सारखं काय खर्च, खर्च उगाळत बसायचं?
मलाही हौस नाहीये सोन्या; पण आता दरमहा निदान 200 रुपये तरी वाढणारेत वीज बिलाचे.
अगदी शॉक बसल्यासारखं दाखवताय.
शॉकच आहे. जोरका धक्का और जोरसे लगे!
तरी बरं, आता उन्हाळा नाहीये.
पण, गेलेल्या उन्हाळ्याची किंमत मोजणं सुरू झालंय ना? उन्हाळाभर कोळसा पुरेसा नाही, वीज उत्पादन कमी आणि मागणी भयंकर वाढलेली. दुसरं काय होणार होतं या सगळ्यातून? शेवटी मिळेल तिथून, मिळेल त्या भावाने वीज खरेदी करण्याची वेळ आली महावितरणवर!
यांना मॅनेज करता येईना आणि जनतेची पिळवणूक थांबेना, असंच ना शेवटी?
घरच्या वापरासाठी 65 पैशांपासून अडीच रुपयांपर्यंत प्रतियुनिट वाढ आहे. औद्योगिक वापराबद्दल बोलायलाच नको.
जास्तीत जास्त उद्योगांनी महाराष्ट्राबाहेर जावं त्यापेक्षा.
मग, तुम्हा तरुणांना नोकर्या कोण देणार? राज्यात पैसा कुठून येणार?
बघा ना! इकडे आम्ही तरुण विजेची वाहनं वापरायचं म्हणतोय आणि महावितरणवाले पाच महिने तरी पावणेतीन कोटी ग्राहकांना वेठीला धरायला निघालंय.
पाच महिने वगैरे ते बोलण्यापुरतं रे!
म्हणजे?
एकदा वाढलेले दर जगात कुठे कमी होतात का?
ते तर झालंच. म्हणजे वीज महागाई आणि त्यावरून आमचं तुमच्या शिव्या खाणं, असंच चालू राहाणार म्हणा!
थोडी आशा आहे ती त्यांच्याच बाजूने. हजारो कोटी रुपयांची थकबाकी आहे म्हणतात महावितरणची.
उद्योग-धंदेवाले बुडवतात ना त्यांचे पैसे?
नुसते ते नाही. शेती करणारे, व्यावसायिक, घरगुती वापरवाले सगळ्यांकडेच असते थकबाकी.
ती वसूल करा ना म्हणावं!
म्हणताहेत सारखे सगळे. परिणाम काही नाही. भरीला वीज चोरीच्या नव्या कल्पना निघत असतात. थांबवता येत नाही.
तसे आपण डोकेबाज लोक, नाही बाबा? कायदे, नियम मोडण्यात आपला हात कोणी धरणार नाही.
यातून तर आपण उच्चांक गाठलाय.
कशाचा?
देशात सर्वात महागडी वीज पुरवणारं राज्य ठरण्याचा!
है शाबाश! कुठेतरी उच्चांक गाठू शकलो हे काय कमी?
तू मान त्याच्यात आनंद. मला मात्र लवकरच वीजबीज विसरून गारगोट्या आणि शेकोट्यांची सवय लावून घ्यावी लागणार, अशी लक्षणं दिसताहेत.
काय करणार त्याने?
गारगोट्या एकमेकींवर घासून ठिणग्या पेटवणार आणि शेकोटीच्या उजेडात कामं करणार! गुहामानव तसाच जगायचा.
करा प्रॅक्टिसला सुरुवात. मी लाकडाच्या मोळ्या घेऊन येत जाईन ऑफिसमधून येताना आणि सातव्या मजल्यावरच्या आपल्या फ्लॅटमध्ये आई करेल जळणावर स्वयंपाक!
चालेल म्हणजे, चालवून घ्यावं लागेल. वीज म्हणाली सोड मला, माणूस पुन्हा गुहेकडे वळला!