संपादकीय

लवंगी मिरची : वादळ आणि गर्जना

Arun Patil

मित्रा, मला एक समजत नाही की सोन्याचे दर घसरले किंवा वाढले अशा प्रकारच्या बातम्या सर्व प्रकारच्या मीडियामध्ये दररोज असतात. मला सांग किती लोक रोज सोने खरेदी विक्री करतात?

सामान्य माणसाला तर सोन्याची खरेदी करण्याची फारशी वेळच येत नाही. आता माझेच उदाहरण घे. माझी बायको 'दोन ग्रॅम सोनं घ्या' म्हणून दोन वर्षांपासून माझ्या मागे लागली आहे, पण ते काही होत नाही. पण या ज्या बातम्या येतात ना त्या मी दररोज काळजीपूर्वक वाचतो. पूर्ण बातमी वाचल्यानंतर लक्षात येते की एक किलोग्रॅम सोन्याच्या दरामध्ये पाचशे रुपयांनी वाढ झालेली आहे. म्हणजे माझ्यासारखा दोन ग्रॅम खरेदी करणार्‍या माणसासाठी ही सोन्याच्या भावात वाढ खूप झाले तरी एक रुपयाचे वर जाणार नाही, पण बातमी तर वाचली जाते ना? दुसरं एक उदाहरण सांगतो. काल वाचण्यात आले की हापूस आंब्याचे दर घसरले. आता मला एक समजत नाही की हापूस आंबा उन्हाळ्यात येतो, तो उन्हाळा सुरू होताच आला. म्हणजे काही लोक आंबे खाण्याची सुरुवात गुढीपाडव्यापासून करतात. अशा लाडोबा असलेल्या लोकांसाठी ही सगळी कसरत असते. आंब्याचे दर वाढले काय अन् घसरले काय, जोपर्यंत आंबे तीनशे रुपये डझन मिळत नाहीत तोपर्यंत मी ते खरेदी करू शकत नाही. जसे सोन्याचे आहे तसेच आंब्याचे आहे.

अजून एक आहे निर्देशांकात उसळी. आता निर्देशांक पडला काय आणि चढला काय, माझ्यासारख्या सामान्य माणसाला काय फरक पडतो? आपण कधी शेअर घेतला न विकला, कारण महिन्याचा खर्च भागवता भागवता नाकी नऊ येतात तिथे शेअर विकत घेणार कोण आणि ते विकून टाकणार कोण? पण असतात या बातम्या, दररोज असतात.

म्हणजे काही शब्द परस्परांशी इतके जोडले गेले आहेत की तशा पद्धतीने वाचले नाही तर करमत नाही. उदाहरणार्थ शेअर बाजार म्हटले की कोसळला, गडगडला, उसळी, भरारी हे शब्द येतात. सोन्याचे भाव आले की किंचित घसरले, वधारले, महागले हे शब्द येतात. महागाई म्हटले की भडका शब्द असतोच असतो. तसेच राजकारणामध्ये फितुरी, पाठीत खंजीर, कोथळा, प्रहार, गर्जना हे शब्द येतात. म्हणजे कोणत्यातरी प्रखर युद्धाला सुरुवात झाली आहे की काय, असे भास व्हायला लागतात. सारख्या सारख्या तशाच प्रकारच्या शब्दांचा मारा आपल्या कानावर होत असल्यामुळे परवा माझ्या पाचवीत जाणारा मुलगा मला म्हणाला की, 'पप्पा कॅडबरी आणून द्या, नाहीतर पाठीत खंजीर खूपशीन'.

एखादा शिक्षक रागवला तर विद्यार्थ्याने त्यांना 'सर, रागाऊ नका, नाहीतर कोथळा बाहेर काढीन', अशी धमकी दिली तर आश्चर्य वाटायला नको. बिल्डर हा शब्द आला की पाठोपाठ खंडणी, सुपारी हे शब्द येतात. भाज्यांचे दर हा शब्द आला की कडाडले हा शब्द येतो. कोरोना म्हटले की लाट, लागण हे शब्द ठरलेले असतात. विधानसभा म्हटले की खडाजंगी हा शब्द हमखास येणारच. लोकसभा म्हटले की वादळी अधिवेशन हा शब्द येणारच. ईडी म्हटले की छापेमारी, समन्स, चौकशी हे शब्द येतात. आपल्या मराठीमध्ये कोणती भलतीच नवीन भाषा आली आहे, असे आजकाल मला वाटायला लागले आहे. यालाच तर मराठी भाषा समृद्ध होणे म्हणतात. तशा पद्धतीचे शब्द वाचण्याची, ऐकण्याची आपल्याला सवय होऊन गेली आहे. पण ते काहीही होवो तू आपला फितुरी करून, माझ्या पाठीत खंजीर खुपसू नकोस, नाहीतर मी तुझा कोथळा बाहेर काढेन!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT