काय हो, आज सकाळी सकाळी इतक्या का उड्या मारत आहात?
अगं म्हणजे काय? बातमीच तशी आहे. लवकरच महिलांचं आयपीएल सुरू होणार आहे. पहिल्यांदाच भारतामध्ये महिला क्रिकेटला इतके चांगले दिवस आलेत.
हो, ते ठीक आहे हो; पण तुम्हाला उड्या मारायला काय झालं ते आधी सांगा. आता हे बघ, पुरुषांचं आयपीएल होतं तिथे चौकार, षटकार पडला की चिअर गर्ल्स असायच्या. आता या महिलांच्या आयपीएलसाठी चिअर बॉईज असतील का, असा प्रश्न माझ्या मनात आला. विशेष काही काम नाही आणि तू सुखाने घरी बसू देत नाहीस म्हणून विचार केला की चिअर बॉईजमध्ये आपण जावे आणि महिला क्रिकेटपटूने चौकार, षटकार मारला की, अंग गदा गदा हलवीत हात पाय हलवावेत म्हणजे तेवढाच व्यायाम पण होईल आणि दिवसाकाठी पैसे पण मिळतील.
अहो, ते दिसायला सोपं दिसतं; पण तुम्हाला होणार आहे का या वयात? तेही प्रत्येक चौकार- षटकारावर कंबर हलवत हातवारे करणे? गपगुमान घरी पडा आणि टीव्हीवर मॅच पाहत बसा. पाया मुरगळला, कंबर लचकली तर दवाखान्यात आडवे पडून राहाल.
अग असं काय करतेस? रोज सकाळी फिरायला जातो ना मी फिटनेस टिकवण्यासाठी. माझ्या शरीराला व्यायामाची सवय आहे आणि शिवाय तेवढेच चार पैसे कमावणे होईल.
काही नको. जे चाललंय ते खूप चांगलं चाललंय आणि काय हो, क्रिकेटमधलं तुम्हाला काही कळतं का?
अगं लहानपणी क्रिकेट खेळलोय मी. आधी माणसं खेळायची, आता बायका खेळतील एव्हढाच काय तो फरक. बरोबरच आहे म्हणा! नाहीतरी टेनिस मधलं तुम्हाला काही कळत नाही; पण विम्बल्डनच्या महिलांचे मॅचेस मात्र आवर्जून पाहता. सारखे डोळे गरगरा फिरत असतात तुमचे आणि मान इकडे तिकडे वळवून मागच्या वेळेला अवघडून गेली होती. डॉक्टर कडे जाऊन सरळ करून आणावी लागली. आता या क्रिकेटच्या नादात हातपाय वाकडे करून घेऊ नका म्हणजे झालं.
अगं, विम्बल्डन म्हणजे टेनिसची पंढरी आहे पंढरी, समजलीस काय? बरं ते जाऊ दे, मला सांग, टीव्हीवरच्या म्हणजे सासू-सुनेच्या भांडणाच्या, नवर्याच्या दुसर्या लफड्याच्या त्या सगळ्या भंकस सीरियल, त्यानंतर साडी वाटपाचे कार्यक्रम, पदार्थ तयार करण्याचे फक्त पाहायचे कार्यक्रम हे सगळं सोडून महिलावर्ग या लेडीज आयपीएलला गर्दी करेल का? तुला काय वाटतं?
छे हो,अजिबात नाही. आधीच तर बायकांना क्रिकेटमधलं काही कळत नाही. तुम्ही दिवस, दिवस रात्र, रात्र जागून जे मॅचेस पाहता त्यात असं काय विशेष आहे हे मला अजून तरी समजले नाही. या लेडीज आयपीएलला झालीच गर्दी तर खेळणार्या मुलींच्या घरचे लोक गर्दी करतील. बाकी सामान्य लोकांना पुरुषांच्या आयपीएलशीच काही घेणं-देणं नाही, तर ते बायकांच्या आयपीएलला कशाला गर्दी करतील? शिवाय सगळ्या महिला युनिफॉर्ममध्ये असणार. ना साड्या, ना फॅशन, ना ब्लाऊज, कानातले दागिने, टिकल्या असले काही नसते तिथे. बायका फिरकत पण नाहीत. हां, पण त्यामुळे एक होईल की तुम्ही घरी बसून राहाल आणि चिवडा कर, पोहे कर म्हणून माझा जीव घ्याल. त्यापेक्षा तुम्हाला काय जे आणून ठेवायचे आहेत ती चिप्स, मुरमुरे, लाह्या पाकिटे आणून ठेवा आणि बसा बघत सगळे मॅच. पण एक सांगते की, आता बायकांनी काबीज करायचं राहिलेलं आहे असं कोणतंही क्षेत्र उरलेले नाही. या आयपीएलपासून महिला क्रिकेट किती मोठ्या उंचीवर जाते, ते पाहत राहा फक्त!
– झटका