संपादकीय

लवंगी मिरची : माँ का लाडला सुधर गया!

Arun Patil

ह्याला काय अर्थ आहे मम्मी?
कशाला?
690 पैकी फक्‍त 55?
बर्‍या आहेत की!
403 पैकी तर अवघ्या 2?
हे कसले आकडे टाकतोयस बाळा?
399 पैकी 387 जागांची अनामतही जप्त?
काय सांगतोस? नाव कधीच घालवलंय आपण. आता अनामत रकमाही जायला लागल्या?
एवढं आश्‍चर्य कसलं वाटतंय? पेपर वाचत नाहीस का?
कसा वाचणार? उगाच सकाळी-सकाळी आपल्याविषयी वाईटसाईट लिहिलेलं वाचून मग पिझ्झा घशाखाली उतरत नाही रे माझ्या.
सकाळीच काय, मी तर कधीच पेपर वाचत नसतो मम्मी. मुळात मला काही वाचायची सवयच नाही ना!

हो रे सोन्या. मला माहितीये तुला वाचायची सवय नाही, विचार करायची सवय नाही. म्हणून तर नेहमी एकच प्रश्‍न लोकांना पडत असतो, तो सध्या काय करतो? हो की नाही?
तेच तर कळत नाहीये. मी काहीच केलं नाही तरी ही अवस्था? पक्षाची 100, 125 वर्षांची पुण्याई गेली कुठे?
100, 125 नाही बाळा. तब्बल 138! नेमके आकडे सांगावेत रे! त्याशिवाय अभ्यास असल्याचं दिसत नाही.
पाच-दहा वर्षं इकडे-तिकडे झाल्याने काय फरक पडतो?
आता कशानेच काही फरक पडत नाही पक्षात; पण पूर्वी पडायचा. क्षण अन् क्षण कारणी लावणारे लोक होऊन गेले.

त्या वाईट सवयीच नडताहेत बघ आता. लोक भलभलत्या अपेक्षा बाळगून बसतात. आता अँटोनी अंकलचंच बघ ना. निकाल लागण्याच्या आधीच ते तुला भेटायला आले.
मी जरा घाबरलेच होते की, ते तुझ्याबद्दल, तुझ्या ताईबद्दल काही तक्रार करतात की काय म्हणून.
का? ताईने काय केलं?
छे छे! ती कशाला काय करत्ये? ती तुझीच ताई पडली. ती फारफार तर आजीसारखं दिसायचा प्रयत्न करणार! अँटोनी अंकलनी राजकारणातून निवृत्तीची भाषा काढलीय.
यह सरासर नाइन्साफी है!
झालं, आता त्यांनीच नाही ते डोक्यात भरवून दिल्यावर एकेक छोटे प्रादेशिक पक्ष हळूहळू कलटी मारणारच ना?

त्यापेक्षा सुरजेवाला अंकल बरे नाही मम्मी? आपण ज्या फांदीवर बसलोय ती कापू नका, असं काहीतरी म्हणाले ना ते? सेन्सिबल परसन. आय मस्ट से!
तसे गुलाम नबीपण सांगताहेत. बाबांनो, मोट बांधून ठेवा. ही वेळ बांधाबांधीची आहे. तू कुठे निघालास?
बांधाबांधी करायला.
कशाची? तू फारतर बांधावरून रमतगमत फिरणारा माणूस झाला आहेस आजवर.
पण आता सामानाची बांधाबांध करायला घेतोय. रशिया-युक्रेन युद्धात कोणीतरी मध्यस्थी करायला हवीये ना? तू जाऊन काय होणार बबड्या? उलट मला टेन्शन. हा कुठे जाऊन काय तारे तोडून येईल वगैरे!

डोंट वरी मम्मी. तिथे जाऊन एकदा हातासरशी निपटूनच येतो तिथला मामला. बाकी काही जमलं नाही तरी शांतीसंदेश तरी देऊन येतो. इथे एवढं होऊन मी शांत राहिलोय की नाही? तेच त्यांना सांगेन. इथे लोकही खूश होतील, मी काहीतरी केलं म्हणून. म्हणतील, माँ का लाडला सुधर गया!

– झटका

लवंगी मिरची

SCROLL FOR NEXT