संपादकीय

लवंगी मिरची : मग विकास नक्कीच होईल!

मोहन कारंडे

मला एक सांग मित्रा, एका गावामध्ये एकूण किती दादा असू शकतात? म्हणजे, असे गृहीत धर की, समजा पुणे हे गाव आपण ठरवले तर तिथे किती दादा असले पाहिजेत, म्हणजे या शहराचा विकास होऊ शकेल? एका एरियामध्ये सहसा दोन-तीन दादा असतात. त्या एरियामध्ये काहीही घडलं तरी सर्व दादांचे त्यावर बारकाईने लक्ष असते. बरेचदा दादानींही बर्‍याच गोष्टी घडवून आणलेल्या असतात. त्यापैकी एका मोठ्या दादाची सत्ता जवळपास सर्वांनी मान्य केलेली असते. एवढ्यात बाहेर गावाहून एक दादा येतो आणि मग सुरू होतो दोन दादांमधील संघर्ष. आता पुण्यामध्ये आधीच एक दादा गेले कितीतरी वर्षे सक्रिय होते. तेवढ्यात गेल्या पाच वर्षांत एक कोल्हापूरचा दादा पुण्यामध्ये आला आणि मग या दोन दादांमध्ये काहीसा संघर्ष सुरू झाला. आता या पुण्यावर वर्चस्व कोणाचे याची कसोटी या दोन दादांमध्ये लागणार आहे. पहिला दादा धूर्त आहे. त्याने बरीच वर्षे या शहराचा कारभार हाकलेला आहे. दुसर्‍या दादाच्या पाठीशी सत्ता आहे आणि तोही दमदार आहे.

पण मला एक सांग, शेवटी कोणाचे वर्चस्व आहे हे सिद्ध होईल? जुना दादा की नवा दादा? म्हणजे काय एकदाचे स्पष्ट झाले की, नेमका आपला दादा कोण? तर जनतेलाही सोपे जाईल. म्हणजे, आपली कामे घेऊन कोणत्या दादाकडे जायचे हे जनतेला स्पष्ट होणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या हे जे पुण्यात असलेले दोन दादा आहेत या दोघांचाही एक कंट्रोलिंग दादा ठाण्यामध्ये आहे आणि दुसरा कंट्रोलर दादा नागपूरचा आहे. त्यामुळे या दोन्ही दादांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही आणि दोन दादा मिळून जर एखाद्या गावाचा विकास करायला लागले, तर त्या गावाचे नशीबच म्हणावे लागेल. जनतेची पण इच्छा असते की, या दोन दादांनी संघर्ष न करता एकमेकांसोबत हात मिळवणी करावी आणि सामोपचाराने शहराचा विकास करावा. शहराचे प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहेत. एका दादाला आटोपतील अशा समस्या राहिलेल्या नाहीत. समस्यांनी अक्राळ-विक्राळ रूप धारण केलेले आहे. त्यामुळे दोन दादांनी मिळून जर शहराचा विकास करायचे ठरवले, तर काहीच अवघड नाही. दोघांचा विचार एकच असेल तर निधीची कमतरता पडणार नाही. त्यामुळे पाच वर्षांत शहराचा विकास होऊ शकतो आणि शहर कुठल्या कुठे जाऊ शकते; पण हे दोन दादा एकत्र आले पाहिजेत हे मात्र महत्त्वाचे आहे.

नाही, पण मी काय म्हणतो महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, तर हे दोन दादा दोन विरुद्ध दिशांनी काम करत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील, ही पण शक्यता आहे. तसे झाले तर शहराचा बट्ट्याबोळ ठरलेलाच आहे. एकच दादा परवडला आणि त्याचीच दादागिरी परवडली अशी वेळ जनतेवर येऊ नये, यासाठी प्रार्थना करू शकतो.

दोन दादा वेगळे होतील, असे मला वाटत नाही. त्या दोघांनी एकत्र येणे ही एक ऐतिहासिक घटना ठरेल. म्हणजे, काय आहे की हे दोन दादा एकत्र आले, तर त्यांचे कार्यकर्ते एकत्र येतील. कार्यकर्ते एकत्र येतील तर एक विचाराने काम होईल. विकास होईल की नाही माहीत नाही. परंतु, जागोजागी होणारा संघर्ष तरी बंद होईल. संघर्ष बंद झाल्याशिवाय शहराचा विकास होत नसतो. त्यामुळे आता पुण्यातील नागरिकांनीच पुढाकार घेऊन या दोन्ही दादांना एकत्र आणले पाहिजे आणि आपला विकास करून घेतला पाहिजे. तसे पुणेकर नागरिक हुशार आहेत. ते बारामतीकर दादा आणि कोल्हापूरकर दादा यांना एकत्र येण्यास भाग पडतील, असे स्पष्ट दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT