आडगाव संस्थानच्या महाराजांचा विजय असो. काही विजय असो वगैरे नको. आपल्या आडगाव संस्थानची पूर्ण वाट लागली आहे. कशाचा विजय आणि कशाचा पराजय? शिक्षणमंत्री, प्रजेच्या आणखी अडचणी काय आहेत ते सांगा. राजकारणी लोक सातत्याने खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार करत असल्यामुळे काल आम्ही राज्यातील सर्व खंजीर जप्त करण्याचा आदेश दिला होता. तसेच खंजीर शब्दाचा उच्चार करणार्यास पोकळ बांबूचे फटके देण्याची शिक्षा जाहीर केली होती. त्याच्या अंमलबजावणीला आजपासून सुरुवात झाली की नाही?.. होय महाराज. आपल्या एका आदेशामुळे राज्यातील खंजीर खुपसण्याचा विषय पूर्णतः संपला आहे. परंतु, इतर काही विषय बाकी आहेत ते मांडण्याची परवानगी द्यावी महाराज.
राज्यातील शिक्षण आणि शालेय अभ्यासक्रम या विषयी आम्हाला अत्यंत जिव्हाळा आहे. त्यासाठी परवानगी मागण्याची गरज नाही शिक्षणमंत्री. तत्काळ प्रश्न सादर करा. जी महाराज. महाराज. कोथळा बाहेर काढणे, फितुरी करणे असे अनेक शब्द अनेक राजकारणी लोक वापरत असल्यामुळे सामान्य लोकांचे जगणे अवघड झाले आहे. हे एक आपले नागरिक आहेत. यांच्या मुलाने 'कोथळा' म्हणजे काय, असा प्रश्न बापाला विचारला. त्यांनी कोथळा म्हणजे, पोटाच्या आतील आतडे आणि इतर अवयव असे त्याचे उत्तर दिले. तेव्हापासून यांचा मुलगा घरातील सुरी चाकू हातात घेऊन स्वतःच्या बापाला, आईला 'मी तुझा कोथळा बाहेर काढीन' अशी धमकी देत आहे.
हे तर फारच गंभीर आहे, शिक्षणमंत्री. राज्यातील सर्व चाकू, सुरे जप्त करायला सांगा आणि कोथळा हा शब्द जर कोणी उच्चारला, तर त्याला मजबूत आणि भरीव बांबूचे शंभर फटके मारण्याची शिक्षा जाहीर करा. अजून काय काय समस्या आहेत?
होय महाराज, समस्या बर्याच आहेत. राजकीय लोकांच्या बोलण्यामध्ये मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे असे नेहमी वारंवार बोलले जाते. असे काही वाचले किंवा ऐकले की, राज्यातील इंग्रजीत नव्हे, तर मराठी माध्यमातील मुलेसुद्धा गोंधळून जात आहेत. म्हणजे, पालकांना पहिल्यांदा मृत म्हणजे डेड बॉडी असे समजून सांगावे लागते. ते सांगितल्यानंतर मुलांना हे समजत नाही की, एखादी व्यक्ती वारली असेल म्हणजे, डेड बॉडीमध्ये तिचे रूपांतर झाले असेल, तर त्याच्या टाळूवर लोणी का लावायचे? अर्थात, लोणी म्हणजे बटर हे आधी समजावून सांगावे लागते. मग मुलांचा प्रश्न असतो की, 'पप्पा, एखादा माणूस डेड झाला, तर त्याचा टाळू नावाचा जो कोणता भाग असेल त्याच्यावर बटर का लावतात? असे करण्यापेक्षा तो माणूस जिवंत असताना त्याला बटर का खाऊ घालत नाहीत?' अशा प्रश्नांची उत्तरे देताना पालकांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे त्यांची सगळ्यांची मागणी आहे की, शालेय अभ्यासक्रमामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश करा, नाही तर तोफेच्या तोंडी देऊन आमचे जगणे संपवून टाका.
प्रजेची मागणी रास्त आहे, शिक्षणमंत्री. सर्वात प्रथम कुणाही जिवंत वा मृत व्यक्तीच्या शरीरावर बटर म्हणजे लोणी लावण्यास पुरती बंदी घालण्याचे आदेश निर्गमित करा. फक्त पोळा सणाच्या आधीच्या दिवशी म्हणजे, खांदे मळणीच्या दिवशी कष्टकरी बैलांच्या खांद्यावर लोणी लावण्यास सूट असेल. तसेच तत्काळ अभ्यासक्रम समितीची पुनर्रचना करा आणि फितुरीपासून ते कडेलोट करण्यापर्यंत सर्व शब्दांचे अर्थ पुस्तकांमध्ये येऊ द्या. नवीन पिढीला कुठल्याही प्रकारचे कन्फ्युजन झाले नाही पाहिजे. येत्या आठ दिवसांत आमच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, तर शिक्षणमंत्री, तुमच्या पाठीत खंजीर खुपसून, तुमचा कोथळा बाहेर काढून, तुमच्या टाळूवर लोणी लावून, बारा हत्तींच्या पायाखाली तुमची डेड बॉडी ठेवून, नंतर कडेलोट केला जाईल, हे ध्यानात असू द्या. या आता. कोण आहे रे तिकडे?