लवंगी मिरची 
संपादकीय

लवंगी मिरची : पश्‍चात बुद्धी

Shambhuraj Pachindre

गण्या, ए गण्या, कुठे आहेस? काय चाललंय?
अभ्यास करतोय बाबा.
आता? अरे, तुझा निकाल लागला, तू नापास झालास, आता लगोलग अभ्यास करून काय करायचंय?
नापासाची फारशी खंत नाहीये बाबा. मला यशाचा कधीच मोह नव्हता. मिरवण्याची थोडीही हाव नव्हती.
पण तुझ्या यशाची आम्हाला नक्‍कीच आस होती. आम्ही ती अपेक्षा ठेवली होती तुझ्याकडून.
माझ्या लक्षात ते आलंय बाबा. मी अभ्यासाकडे पुरेसं लक्ष दिलं नाही, वर्गावर नियमित गेलो नाही. कसा जाणार? तेव्हा माझी तब्येत बरी नसायची ना बाबा?
मग आता एकदम ठणठणीत झालास की काय?
तितकासा नाही खरं म्हणजे. पण आता शाळा पिंजून काढावी असं म्हणतोय मी.
आता अवेळी टुंईटुंई करून पिंजून काय मोठंसं मिळणार आहे रे छकुल्या?
माझी माझ्या शाळेवर निष्ठा आहे बाबा.
नाहीतरी दुसरीकडे ह्यापुढे तुला थारा तरी कोण देणार आहे?
मला माझी शाळा कळून घ्यायचीये बाबा.
बघ बुवा. शाळेला तू पक्‍का कळलायस. तुला पुढे नेण्यात अर्थ नाही हे तिने ठरवलंय.
माझा माझ्या शाळेवर विश्‍वास आहे. तिला एक ना एक दिवस माझी किंमत कळेल.
पण त्याने तुझं गेलेलं वर्ष परत थोडंच येणार आहे?
मला वर्षाचं एवढं काही वाटत नाही बाबा. वर्ष येणार, वर्ष जाणार, जातील, किंबहुना ती जायलाच हवीत. पण, एवढ्या वर्षांत माझ्या हातून एकतरी शाळाविरोधी कृत्य घडलेलं दाखवा बरं बाबा.
मुळात तू कुठलंतरी ठोस कृत्य केलंस का रे सोन्या? विरोधी ठरायला आधी काहीतरी करायला तर हवं होतं.
पहिल्या पाच सर्वोत्तम विद्यार्थ्यांच्या यादीत माझं नाव होतं हे विसरू नका बाबा. मी तर म्हणेन, हे कोणीच विसरू नये, किंबहुना विसरू शकणारच नाहीये बाबा.
ती विसराविसरी थोडावेळ विसर गड्या आता.
लक्षात ठेवण्याजोगं काय केलंस ते सांग.
शक्य तेव्हा वेळोवेळी त्याबाबत मी स्वतः हितगुज करायचो. एरवी माझं म्हणणं मांडायला एक प्रतिनिधीही नेमला होता.
तिथेच चुकलास गड्या. काय तो प्रतिनिधी, काय त्याचा आवाज, काय ती भाषा, काहीच ओके, ओके नसायचं रे पुढेपुढे.
असं म्हणता? तो तर फार खूश असायचा स्वतःच्या कामगिरीवर.
असं तो एकटाच म्हणायचा ना? तू खातरजमा केलीस का कधी? भलती माणसं जवळ केली की अशीच किंमत मोजावी लागते रे माणसाला.
मग आताही मी अभ्यास करूच नये, वर्षा ऋतूची आसच धरू नये, असं म्हणताय का?
असं नामोहरम करणारं मी काही बोलणार नाहीये. पण एक नक्‍की. आता ह्या परीक्षेचा फार नाद तू धरू नयेस हे बरं. पश्‍चात बुद्धी वापरून आणखी पश्‍चातापाची वेळ आणू नकोस. मातोश्रींच्या पदराआड दड आणि 'ओम् नमो, शहाय', सॉरी सॉरी, शिवाय हा मंत्र जपत रहा. दिसली तर तिथूनच दिसेल पुढची वाट.

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT