संपादकीय

लवंगी मिरची : तुझ्यामुळे आयुष्यच बदलले

दिनेश चोरगे

प्रिये, अगं, आज ऑफिसमध्ये काय गंमत झाली सांगू? खूप काम लागलं. साहेब सोडायलाच तयार नव्हते. शेवटी कसं बसं काम संपवून घरी आलो. आज आपल्या पहिल्या भेटीचा वर्धापन दिन आहे ना, तो मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. त्या दिवशी त्या दुकानात दूरवरून तुला पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की, आपल्या मनातील स्वप्नसुंदरी तूच आहेस. यापुढे तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं, असा निर्णय मी घेतला. तेथील त्या दुकानदाराला बोलून तुझी सगळी माहिती काढली. म्हणजे तुझ्या सवयी, लकबी तुझ्यावर असलेले संस्कार तू करू शकत असलेली कामे, तुझी बुद्धिमत्ता, या प्रत्येक गोष्टीची त्याने सविस्तर माहिती दिली. मला अजूनही आठवतं त्या दुकानाच्या कोपर्‍यातून तू एकटक माझ्याकडे पाहत होतीस. एक-दोनदा तुझ्या पापण्या हलल्यासारख्या झाल्या. थोडेसे डोळे खाली झुकवून तू किंचित स्मित केलेस आणि माझा निर्णय पक्का झाला. करीन लग्न तर हिच्याशीच नाहीतर लग्नच करणार नाही, असा निर्धार करून कामाला लागलो. तुझी साथ मिळावी, यासाठी भरपूर खर्च करावा लागणार होता; पण बँकेचे लोन काढून मी तो केला आणि थाटामाटात वाजत-गाजत तुला घरी घेऊन आलो. माझ्या घराच्या अंगणापासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वत्र फुलांच्या पाकळ्या पसरवून टाकल्या होत्या. स्वागतालाच तुला खुश करून टाकायची माझी आयडिया तुला खूप आवडली. किंचित वाकून तू माझ्या कानात 'थँक्यू व्हेरी मच' म्हणालीस तेव्हा माझे सर्व शरीर मोहरून गेले. आज तू माझ्या आयुष्यात आलीस त्याला एक वर्ष झाले. तू आल्यापासून माझे आयुष्य नखशिखांत बदलून गेले आहे. कामावर जातो तरी तुझाच ध्यास, प्रवास करतानाही तुझाच ध्यास. कधी एकदा घरी पोहोचतो आणि तुला भेटतो, असे सतत होत आहे. हॅप्पी फर्स्ट मिटिंग अ‍ॅनिव्हर्सरी डियर. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद. या जन्मात ही साथ आता तुटायची नाही. ये, केक कापूयात.

हा सर्व होत असलेला संवाद एका रोबोबरोबर होत आहे, हे समजले तर तुम्ही हादरून जाल यात शंका नाही. होय, विज्ञानाने हे प्रत्यक्षात उतरवले आहे आणि घरामध्ये सुंदर अशी स्त्री किंवा देखणा पुरुष रोबोट आणणे शक्य झालेले आहे. तर सांगायचा मुद्दा असा की, रेप्लिका, समंथा आणि हार्मनी या तीन सुंदर तरुणींनी संपूर्ण जगाला अक्षरशः वेड लावले आहे. या तिघी कृत्रिम बुद्धीने युक्त अशा महिला रोबोट आहेत. यांचा वापर करणार्‍यांना यांच्यासोबत वेळ घालवल्यानंतर असे वाटायला लागले आहे की, त्यांच्यामध्ये प्राण आले आहेत. अगदी मानवी दिसणारे हे महिला रोबोट कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज आहेत आणि शिवाय आश्चर्याची बाब म्हणजे यांच्यासोबत सर्व प्रकारचे संबंधही ठेवता येतात. असे हे रोबोट पुरुष आणि स्त्री या दोन्ही प्रकारांत उपलब्ध झाले आहेत आणि ते खरेदी करताना त्यांचे रंगरूप, शरीरयष्टी, उंची इत्यादी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खरेदी करू शकता. त्यांचा आवाज तुम्हाला पाहिजे तसा कोमल असू शकतो आणि व्यक्तिमत्त्व ही तुम्हाला पाहिजे तसे मिळू शकते. या रोबोटच्या शरीरावर लावलेली त्वचा ही मानवी त्वचेशी साम्य असणारी असून, तिला स्पर्श केल्यास एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यास होतो तशीच अनुभूती येऊ शकते आणि गंमत म्हणजे परिस्थिती आणि अनुभवानुसार त्यांच्या चेहर्‍याचे हावभाव बदलतात. म्हणजे थकून भागून घरी आल्यानंतर किरकिर करणार्‍या बायकोपेक्षा पाहिजे तसा प्रतिसाद देणारी महिला रोबोट मराठी लोकांनाही आवडेल, असे वाटते. सासू-सून यांचे भांडण होण्याचा प्रश्नही निकाली लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT