संपादकीय

लवंगी मिरची : जाने वो कैसे लोग थे?

Arun Patil

नेहमीच्या कट्ट्यावर यायला आबुरावांना जरा उशीरच झाला काल. त्यांना वाटलं होतं, बाबुराव वाट बघून कंटाळले असतील. गेल्या गेल्या चिडचिड करतील, वाकडं बोलतील; पण बाबुराव आपले मन लावून गुणगुणत बसलेले. आबुरावांनी लक्ष देऊन ऐकलं तर बाबुराव म्हणत होते, 'जाने वो कैसे लोग थे जिनके, प्यारको प्यार मिला। हमने तो बस कलियाँ मांगी, काटोंका हार मिला. ते दर्दभरं गीत ऐकून आबुरावांना गप्प राहावेना. वाकून हळूच म्हणाले,
काहो बाबुराव, आज एकदम गाणंबिणं?
हो.
तेही असं दुःखी? उदास करणारं? ह्या गाण्याची आठवण का काढलीत एकदम?
मी नाही काढली. खासदार अरविंद सावंतांनी काढली.
कधी आणि कशामुळे म्हणे?
खातेवाटपामुळे हो, त्यात मनमानी करणार्‍यांना टोला मारण्यासाठी!
टोला ठीक आहे, पण एकदम गाण्याचा हल्ला कशाला म्हणतो मी?
खातेवाटप जिव्हारी लागलंय ना काहींच्या. म्हणून अशी दर्दभरी गाणी सुचताहेत. बरेच आहेत सुरात सूर मिसळणारे.
सगळे मिळून गाणार आहेत?
घाबरू नका. प्रत्यक्ष गात नाहीये कोणी. मुळात हवी ती खाती मिळाली नाहीत, ह्याबद्दलची नाराजी. पण एकदम तोंडावर कसं बोलायचं ते? म्हणून मग कुठे ट्विट करा, कुठे गाणी म्हणा, टोमणे मारा असं चाललंय सध्या. मराठी अवतरणं संपली म्हणून हिंदी, उर्दूतही शिरताहेत लोक.
आता सगळा निषेध राष्ट्रापर्यंत पोहोचवायचा तर राष्ट्रभाषा हवीच. अपनोंका प्यार रास नही आया, गैरोंकी बेईज्जती भा गयी, वगैरे त्यापायीच सुरू आहे सध्या.
पण गरज पडल्यास खात्यांची अदलाबदल करू असं म्हटलंय ना श्रेष्ठींनी?
त्यावर विसंबता येत नाही. आता पहिले मुद्देमाल ज्यांच्या पदरात पडला ते सुटले.
असं प्रत्येकानंच म्हटलं तर राज्य कसं चालायचं हो?
ते काय, चाललं तरी चालतं. नाही चाललं तरी कोणा ना कोणावर खापर फोडता येतंच. कोण कशा चाली खेळतंय त्यावर असतं बरंचसं.
हे म्हणजे शाळेच्या गॅदरिंगच्या नाटकात प्रत्येक मुलाला राजाच व्हायचं असतं, तसं झालं नाही का? बाबांनो, एका गोष्टीचा एकच नायक असतो, एकच राजा असतो, असं समजावावं लागतं त्यांना!
मुलांना समजावून समजतं तरी. मोठ्यांना काय सांगणार?
मला वाटतं, जुन्या नामवंतांची उदाहरणं द्यावीत. यशवंतराव चव्हाण म्हणा, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, वसंतराव नाईक ही मंडळी पदासाठी थांबली का? त्यांना हवी ती कामं त्यांनी राज्यासाठी करून घेतलीच ना?
ही जुनी आणि फार मोठी नावं झाली हो.
मग तुलनेने नवी देतो. आपले राजेश टोपे, कोरोनाकाळात आरोग्यखात्याकडून केवढी कामगारी बजावून घेतली त्यांनी?
खरंय.
म्हणून वाटतं, जाने वो कैसे लोग थे, हा शोध अशा कर्त्या मंत्र्यांबाबत घ्यावा. आपण फक्त कळ्याच मागणार, दुसर्‍यांना खुश्शाल काटोंके हार मिळू देत ही इच्छा पुरे करावी.

– झटका

SCROLL FOR NEXT