संपादकीय

लवंगी मिरची : कोणत्या झेंड्याखाली येऊ एकत्र?

backup backup

लवंगी मिरची : संगमनेरकर बाळासाहेबांनी 'सर्वांनी झेंड्याखाली एकत्र यावे,' असा निरोप पाठविला. कार्यकर्ते बुचकळ्यात पडले. कारण, हायकमांड आणि आदेश हेच समीकरण त्यांच्या डोक्यात होते. सध्या काही बोललं की, लोक अध्यक्षपदाचे काय? असा प्रश्‍न विचारतात. त्यामुळे हायकमांड बोलण्याच्या मनःस्थितीत नाहीत, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या निरोपाने त्यांच्या डोक्यातला गुंता आणखीनच वाढला. कार्यकर्त्यांत फोनाफोनी झाली. ते एकमेकांना विचारू लागले, 'साहेबांचा निरोप मिळाला का?

सर्वांनी झेंड्याखाली एकत्र यायचं आहे.' दुसरा कार्यकर्ता विचारू लागला, 'पण कुठे? पश्‍चिम महाराष्ट्रात, विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात, कोकणात की मराठवाड्यात?' तिसरा म्हणाला, 'कुठेही जमलं तरी फार लोक जमा होणार नाहीत. सध्या तरी आपल्याच गावात जमूयात.' एकाने दबकत विचारले, 'आपण एकत्र यायच्या गोष्टी करतो; पण कोणत्या झेंड्याखाली एकत्र यायचे, ते तरी विचारून घ्या.'

एकाने कराडकर बाबांना फोन लावला. बाबा म्हणाले, 'मी समोर पाहून चालणारा आणि काम करणारा माणूस आहे. मी मान उंच करून पक्षाच्या झेंड्याकडे वगैरे कधीच पाहत नाही. सध्या तरी कोणत्या झेंड्याखाली एकत्र यावे याचे उत्तर मी देऊ शकणार नाही.

बाळासाहेबांनी सांगितले आहे तर तुम्ही त्यांनाच विचारा.' दुसर्‍या कार्यकर्त्याने अशोकरावांना फोन लावून हाच प्रश्‍न विचारला. ते म्हणाले, 'कित्येक महिन्यांत पक्षाची बैठकच झालेली नाही. बैठकीत विचारविनिमय न होताच बाळासाहेबांनी असे जाहीर करावे, याचे मला आश्‍चर्य वाटते. तरीही आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. कोणत्या झेंड्याखाली जमायचं हे मलाही माहीत नाही; पण एकत्र येण्याचा विचार मात्र अनुकरणीय आहे.'

वैतागलेल्या कार्यकर्त्यांनी नानांना फोन लावला. नाना म्हणाले, 'सध्या तरी हायकमांडचा कोणताही आदेश नाही. सध्या पक्षाला अध्यक्षच नसल्यामुळे चिंतन शिबिरात कोणाच्या हस्ते झेंडा फडकवायचा यावर वाद होऊ नये, म्हणून झेंडा फडकविणे या प्रकारालाच आम्ही ठेंगा द्यायचे ठरविले आहे. असे असताना बाळासाहेबांनी झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन करावे, ही माझ्यासाठीसुद्धा धक्‍कादायक बाब आहे, तरीदेखील मी माहिती घेऊन सांगतो.'

लवंगी मिरची :

कार्यकर्त्यांनी बुजुर्ग म्हणून सुशीलकुमारांना फोन लावला. ते म्हणाले, 'सध्या ज्येष्ठांचे पक्षात काहीच चालत नाही. माझ्या इतक्या वर्षांच्या राजकीय अनुभवावरून मी सांगतो, आपला पक्ष आघाडीचा धर्म पाळणारा आहे. सध्या महाआघाडी कारभार असल्याने महाआघाडीचा जो संयुक्‍त झेंडा असेल, त्याखाली सर्वांनी एकत्र यावे, असे त्यांना म्हणायचे असेल; पण असा संयुक्‍त झेंडा माझ्यातरी पाहण्यात नाही.

त्यामुळे कोणत्या झेंड्याखाली एकत्र यावे, असा प्रश्‍न जसा तुम्हाला पडला आहे, तसाच मलाही पडला आहे.हा विषय तुमच्या-माझ्यातच ठेवा. तुम्ही गुपचूप थोरल्या पवारांना फोन करा. ते नक्‍की सांगतील. कारण, पक्ष कुठलाही असला तरी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्या झेंड्याखाली एकत्र यायचं हे तेच ठरवितात.' हे ऐकून कार्यकर्त्याला ब्रह्मज्ञान मिळाल्याचा साक्षात्कार झाला आणि त्याचा जीव भांड्यात पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT