सध्या आपले पंतप्रधान अमेरिकेच्या दौर्यावर आहेत आणि त्यांची ही भेट सर्वार्थाने गाजत आहे. अगदीच थोडक्यात सांगायचे म्हणजे, जगभरातील देशांना पुढील काळात भारत अमेरिका संबंध कसे असतील, याविषयी उत्सुकता आहे. अमेरिकेने आपल्या पंतप्रधानांचे केलेले स्वागत, तर आपल्या शेजारी पाजारी असणार्या देशांना अत्यंत आश्चर्यचकित करून गेले आहे.
जाऊ दे मित्रा, आपल्या देशातील अनेक लोकांनाही जो धक्का बसला आहे त्यातून ते अद्यापही सावरलेले नाहीत; पण मला एक सांग, हे सर्व आपण टीव्हीवर पाहत आहोत. मग, आज विशेष काय तुझा मूड आला या विषयावर चर्चा करण्याचा?
अरे, विशेष काही नाही. भारत-अमेरिका सहकार्याचे अनेक करार या दौर्यात होत आहेत; परंतु लढाऊ विमानांच्या इंजिनची निर्मिती अमेरिका आता भारतात करणार आहे, या बातमीने मी फार भारावून गेलो आहे.
होय तर! ती बातमी वाचली तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न आला की, जर अमेरिकेला विमानांची निर्मिती करायची असती, तर त्यांनी साध्या सुध्या विमानांची किंवा प्रवासी विमानांची का केली नसेल? म्हणजे लढाऊ विमानांचे इंजिन भारतातच तयार करण्याचे काय कारण असेल?
अरे साधे, सोपे आहे. याचे एकमेव कारण म्हणजे, येथील माणसे लढाऊ बाण्याची असतात. त्यात पुन्हा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये लढाऊ विमानांच्या इंजिनांची निर्मिती झाली, तर या विमानांना जगात कोणी हरवू शकणार नाही. याचे कारण म्हणजे, मराठी माणसांमध्ये असलेला लढाऊ बाणा. मराठी माणूस हा सतत कोणाशी ना कोणाशी तरी लढत असतो. आधी दीडशे वर्षे इंग्रजांच्या बरोबर लढला, इंग्रजांना पराभूत केले आणि त्यांच्या देशाला परत पाठवून दिले; पण दरम्यानच्या काळात डीएनएमध्ये आलेला लढाऊ बाणा काही गेला नाही. मराठवाड्यासारख्या भागामध्ये त्यांनी निजामाशी लढा दिला. गोव्यामध्ये पोर्तुगीजांबरोबर लढा दिला आणि परक्यांशी लढा संपल्यानंतर तो आपल्याच लोकांबरोबर लढू लागला. कारण, लढाऊ बाणा जिवंत होता ना!
म्हणजे मला नाही समजले. अरे, परकीय शक्तीला परतवून लावण्याचे काम तर करावे लागणार होतेच ना? आता कुठे काय लढा चालू आहे? सर्व काही सुरळीत चालू आहे असे वाटते.
साफ चूक आहे. लढा अजूनही सुरूच आहे. एखादा दूध संघ असतो किंवा पतपेढी असते किंवा गृहनिर्माण संस्था असते, तिथे कार्यकारिणी निवडून आलेली असते. जशी त्या कार्यकारिणीची वेळ संपत येईल तसा त्याच्या विरोधात लढा सुरू होतो. एक नवीन पॅनेल उभे राहते आणि त्या आधीच्या पॅनेल बरोबर संघर्ष करते, हा लढाऊ बाणा नव्हे तर काय आहे?
शिक्षकांच्या, कर्मचार्यांच्या संघटना असतात. त्यावर कुणाचे वर्चस्व असावे, यासाठी बरेचदा लढा होतो आणि वेळ-प्रसंग आला राडा पण होतो. वैचारिक मतभेद असतानाची गोष्ट होते, तिला लढा असे म्हणतात आणि वैचारिक मुद्दे संपून शारीरिक मुद्द्यांवर संघर्ष होतो तेव्हा त्याला राडा असे म्हणतात. म्हणजे वेळ-प्रसंग असेल, तर लढा आणि निकराच्या क्षणी प्रत्यक्ष शारीरिक संघर्ष करून राडा करण्याची भारतीय माणसाची आणि विशेषत्वाने मराठी माणसाची प्रवृत्ती पाहून अमेरिकेने आपल्या लढाऊ इंजिनांची निर्मिती करण्यासाठी आपल्या देशाची निवड केली असावी, असे मला वाटते.
– झटका