संपादकीय

मुंबई महापालिका : गर्दीत हरवलेले विरोधक जिंकणार कसे?

Arun Patil

तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी या दोन्ही पक्षांची स्पर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चौखूर उधळणार्‍या भाजपशी नाही. 2024 साली लोकसभेचे रणांगण आखले जाईल तेव्हा विरोधकांचा नेता कोण, या स्पर्धेत ते काँग्रेसशीच लढत आहेत. विरोधकांची जितकी गर्दी तितका भाजपचा जास्त फायदा, असे सूत्र आहे. मुंबई महापालिका रणांगणातही हेच होऊ घातले आहे.

सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष कोणत्याही लोकशाहीला अभिप्रेत असतो. मात्र, लोकशाहीत याही पलीकडची समीकरणे उगवतात आणि सत्ताधारी विरुद्ध विरोधक विरुद्ध विरोधकांचे विरोधक असा तिहेरी सामना सुरू होतो. खास करून उत्तर प्रदेश आणि गोव्यातील विधानसभा निवडणूक निकालांनी हा सामना आता अनुभवला. त्याचे थेट परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीवर होणे अटळ आहे. म्हणूनच या विचित्र तिहेरी सामन्याची दखल घेणे भाग आहे. मुंबईच्या 236 प्रभागांची लढाई सुरू होईल तेव्हा सत्ताधारी शिवसेना विरुद्ध केंद्रीय सत्ताधारी भाजप असा दोन सत्तांचा सामना बघायला मिळेल. मात्र, ही कुस्ती निकाली लावण्यासाठी विरोधक आणि विरोधकांचे विरोधक कशी भूमिका घेतात यावर सारा खेळ अवलंबून असेल.

गोव्यात भाजपने सत्तेची हॅट्ट्रिक साधली. ऐन निवडणुकीपूर्वी हमखास जिंकू शकतात असे विविध पक्षांतील, मूळ भाजपचे आणि अपक्ष असे 11 नेते भाजपने पक्षात आणले आणि विजय सुनिश्‍चित केला. मागच्या वेळी भाजपचे 13 आमदार होते, ते यावेळी 20 वर पोहोचले. मात्र, गोव्यातील रणधुमाळीकडे बारकाईने पाहाल तर भाजपचा विजय सोपा केला तो ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने आणि अरविंद केजरीवालांच्या 'आप'ने. यातील तृणमूल काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही आणि आम आदमीला जेमतेम दोन जागा मिळाल्या असे कुणीही म्हणेल. मात्र, या दोन्ही पक्षांचा प्रचार हा भाजपविरुद्ध कमी आणि काँग्रेसविरुद्ध जास्त होता.

या दोन्ही पक्षांची स्पर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चौखूर उधळणार्‍या भाजपशी नाही. त्यांची स्पर्धा आहे ती सतत विरोधी पक्षांच्या नेतेपदावर दावा सांगणार्‍या राहुल गांधींशी. 2024 साली लोकसभेचे रणांगण आखले जाईल तेव्हा विरोधकांचा नेता कोण, अशीही स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेत ममता बॅनर्जी सर्वात पुढे दिसतात. काँग्रेसला मत द्याल तर ते वाया जाईल, असा प्रचार ममता आणि केजरीवाल यांनी गोव्यात चालवला.

काँग्रेसला जेमतेम 12 जागांवर जखडण्याचे, रोखण्याचे बरेचसे श्रेय तृणमूल आणि 'आप'ला द्यावे लागेल. काँग्रेसला रोखण्यासाठी काँग्रेसचे विरोधक आक्रमक प्रचार करत मैदानात उतरल्यामुळे काँग्रेसविरोधात भाजपला वेगळी मेहनत घ्यावी लागली नाही. 2017 च्या निवडणुकीत भाजपचा मतांचा टक्‍का 33 होता. या निवडणुकीतही भाजपला 33 टक्केच मते पडली. मात्र, विरोधकांच्या कृपेने या 33 टक्क्यांतच भाजपने 13 वरून 20 जागांपर्यंतची मजल मारली.

उत्तर प्रदेशचा रणसंग्राम देशातील सर्वात मोठा समजला जातो. मात्र, तिथे विरोधकांचे अवतार म्हणावे की दशावतार बघायला मिळाले. समाजवादी पार्टीने स्थानिक जातीय समीकरणे लक्षात घेऊन छोटे पक्ष सोबत घेतले. मात्र, सप, बसप, एमआयएम हे मोठे पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत. यातील सपचा अपवाद वगळता बसप आणि एमआयएम हे दोन विरोधक विरोधी पक्षांना गारद करण्यासाठी आणि भाजपचा विजय सुकर करण्यासाठीच मैदानात उतरले होते काय? असा प्रश्‍न आहे.

एक तर बसप नेत्या मायावती प्रचारात खूप उशिरा उगवल्या आणि तुलनेेने सर्वात कमी सभा घेऊन त्यांनी प्रचाराची औपचारिकता तेवढी पूर्ण केली. परिणामी, बसपला 4 वेळा सत्ता देणार्‍या मायावतींच्या मतांचा टक्‍का 22.23 टक्क्यांवरून 12.8 टक्क्यांवर आला. बसपची 9.5 टक्के मते घटली. त्यातील 3.2 टक्के मते सरळ भाजपला गेली. उरलेली 6.3 टक्के सपकडे झुकली. त्यात बसपच्या परंपरागत दलितेतर मतांचा समावेश अधिक आहे.

अनेक ठिकाणी विरोधकांचे उमेदवार पाडण्याचेच काम बसपने केले. अशा 243 जागा आहेत की, जिथे पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकांवरील उमेदवारांच्या मतांतील फरकांपेक्षा बसपच्या उमेदवारांनी घेतलेली मते अधिक आहेत. अशा 144 जागा भाजपने जिंकल्या आणि 9 जागा सपने जिंकल्या. याचा अर्थ मायावतींची हार ही भाजपची सर्वाधिक जीत ठरली. बसप ही भाजपची बी टीम नव्हे. मात्र, तशी भूमिका बसपने बजावली. हीच भूमिका असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाने बजावली.

लढवलेल्या 95 पैकी एकही जागा एमआयएमने जिंकली नाही. मात्र, एमआयएमच्या या पराभवानेही भाजपला जबरदस्त टक्‍कर देणार्‍या समाजवादी पार्टीचे किमान 7 जागी थेट नुकसान झाले. शिवाय आणखी 7 ते 8 जागी मुस्लिम मतांचे विभाजन करण्यात एमआयएमला यश आल्याने भाजपचा विजय सुकर झाला. एमआयएमने लढवलेल्या सर्व 95 जागी काँग्रेसला एमआयएमच्या उमेदवारांपेक्षा कमी मते पडलेली दिसतात.

हा खेळ पाहिल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत कोणता खेळ होणार, याचा अंदाज बांधता येतो. यातील तृणमूल काँग्र्रेसचे अजून मुंबईत आगमन झालेले नाही. आम आदमी, एमआयएम, सप हे मुंबई महापालिकेच्या रणांगणात ताकदीने उतरणार. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच राष्ट्रीय जनता दल, इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्याशी युती जाहीर केली. आणखी काही छोट्या पक्षांच्या ते प्रतीक्षेत आहेत.

यातील आयएमएमचा मोठा प्रभाव केरळात आणि तामिळनाडूत दिसतो. राष्ट्रीय जनता दल बिहारात आपला एक मोठा टक्‍का बाळगून आहे. या दोन्ही पक्षांचा मुंबईतील प्रांतीय समीकरणांवर प्रभाव नाकारता येत नाही. मुंबईत बिहार, केरळ आणि तामिळनाडूतून आलेल्या मतदारांची मते आंबेडकर आपल्या आघाडीकडे खेचतील. आम आदमीचे अण्णा हजारेंसारखे आहे. जसे अण्णांचे कुणाशी जमत नाही, तसे आम आदमीचेही. म्हणजे आम आदमीही स्वबळावर उतरणार. एमआयएमने यापूर्वी मुंबईच्या सत्ताकारणात चंचूप्रवेश केलाच आहे.

समाजवादी पार्टी महापालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. हे सारे विरोधी पक्ष मुंबईच्या मैदानात उतरतील ते भाजपविरोधात नव्हे तर एकमेकांच्या विरोधात. तसा पाचवा क्रमांक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होता. मात्र, 7 पैकी 6 शिवसेनेत गेले आणि एक राहिला. तरीही खेळ बिघडवण्याची ताकद बाळगून असलेली मनसेही भाजपविरोधात नव्हे तर सेनेसह विरोधकांच्याच विरोधात उभी ठाकणार. विरोधी पक्षांची अशी जितकी गर्दी जास्त, तितका भाजपचा फायदा अधिक. मुंबई त्याच दिशेने जाणार काय?

विवेक गिरधारी

SCROLL FOR NEXT