मापात पाप www.pudharinews. 
संपादकीय

मापात पाप, उण्यात पुण्य!

backup backup

काय हो भाऊसाहेब? तुमची बायको कटकटी आहे का हो? बायको म्हटली की कटकटी असायचीच अण्णासाहेब. नवर्‍याचं डोकं खाणं आवडतंच बायकांना! मलापण तसंच वाटतंय. आज तर आमच्या कारभारणीनं कमालच केली. कॉफीच्या पुड्यात कमी कॉफी होती, असा धोसरा लावलाय. आसं त्यांना कसं कळलं म्हणे? लवकर संपली म्हणतेय पुड्यातली कॉफी. नेहमी शंभर ग्रॅम कॉफी आठवडाभर जाते आमच्या घरात. या खेपेला पाच दिवसांतच संपली म्हणतेय.

सांडली असेल, पुडा भिजला असेल. नाही. तशी हलगर्जीपणा करणारी नाहीये ती. नेहमीचा पुडा, नेहमीच्या वाण्याकडून चांगला पॅक बघून आणलान. आता पॅक करतानाच कंपनीने मापात पाप केलं असेल, तर काय माहीत?  होय काय? आमच्या घरातपण असंच काही तरी झेंगट चाललेलं. परवाच्याला बिस्किटाच्या पुड्यात नेहमी बारा बिस्कुटं असतात, तर परवा दहाच निघाली म्हणून आमचे नातू बसलेले एकमेकांच्या उरावर! असं फक्‍त आपलंच होतंय का सगळ्यांची शेम स्टोरी चाललीये म्हणे? आमचा पोरगा म्हणतो की, हा कंपन्यांचा नवा डाव चाललाय काहीतरी. महागाई झेपेना, मग तेवढ्याच पैशात माल कमी द्यायचा, अशी

आयडियाची कल्पना चाललीये म्हणे. बाबो, ही म्हणजे फसवणूकच की! हो. फक्‍त छान चांदीत, रंगीबेरंगी पॅकमध्ये वगैरे गुंडाळलेली! आपण काय, विकत घेतलेल्या प्रत्येक पॅकचं वजन चेक करत बसतो का? ती तुमची कॉफीच घ्या ना! इथे मागवलीयेत ती? मग येऊ द्या. बघा, त्या कॉफीची किती चटक लागलीये तुम्हाला, बघा तुम्हीच. शंभर ग्रॅमच्या पॅकमध्ये नव्वद ग्रॅम भरली, तरी घेणारच ना तुम्ही? हो ना! शिवाय पुड्यात दहा-पंधरा ग्रॅम कमी भरलेली आपल्याला कशाला कळत्येय? जरा वजनदार पॅकिंग वापरलं, तर वजन पहिल्यासारखंच लागणार हाताला! वर आपण खूश होणार की बुवा, महागाई कितीही वाढली तरी कॉफी पहिल्याच दरात मिळते हो.

अरेरे! मापात पाप करण्याची किती वाईट ही सवय! असं कोणी मोजमापं, प्रमाणं बदलतं का? बदलतात की! पण, राजरोस बदलणं वेगळं, चोरून बदलणं वेगळं. राजरोस बदलणं म्हणजे? म्हणजे बघा, महाराष्ट्र सरकारने कामाचा आठवडा सहाच्या जागी पाच दिवसांचा केला. माप बदललं! पण, सांगून सवरून. सराफांनी सोनं विक्री तोळ्यावरून ग्रॅमवर आणली. पण, उघडउघड. बरोबर? खरंय की तुम्ही म्हणता ते. तोळ्यापेक्षा दहा ग्रॅम कमीच भरतात की. खाण्याच्या तेलाच्या पिशव्यातही आता लिटरभर तेल भरताना नऊशे ग्रॅम भरतात ना? हो वाटतं. मोबाईल कंपन्यांनी सीम कार्डचा महिना असाच अठ्ठावीस दिवसांचा केलाच की बघता बघता! मापात पाप असं फक्‍त म्हणायचं नाही आपण ग्राहकांनी.

कसे दिवस आलेत बघा! आता प्रत्येक मापात लुडबूड करताय तसाच आपल्या शेतमालाच्या सरकारी खरेदीसाठी क्विंटलपण नव्वद, ब्याण्णव किलोचा करा म्हणावं. हमीभाव तोच द्या, पण माल कमी उचला. तेवढाच थोडा दम टाकतील बिचारे. मापात पापं सगळेच करतात, उणं घेऊन पुण्य कमवायची ही आयडिया कशी वाटते?
बेश्ट! तेवढा तरी बळीराजाचा दुवा घ्यावा कधीतरी!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT