संपादकीय

भेदाभेद अमंगळ!

backup backup

परवापासून कोपर्‍यावरच्या घरात काय एवढं महाभारत शिजतंय हो?
काहीतरी उद्योग करून ठेवलाय त्यांच्या तरुण पोरीने.
तसे उद्योग केले नाहीत तर पोरींचा तरुणपणा सिद्ध कसा व्हायचा?
पार पालिसांपर्यंत गेलं की सगळं लचांड.
'अमर प्रेम' का?
हो. पुढे 'फरार'ची रिळं सुरू. आता 'कैदी नंबर अमूकतमूक' व्हायला वेळ नाही लागायचा.
पोलिस बोलवेपर्यंत काय उत्पात केला सुकन्येने?
परधर्मात लग्न करण्याचा प्रयत्न.
एवढंच ना?
एवढंच? अहो, गावभर बभ्रा होणार, घरादाराची अब्रू धुळीला मिळणार हे कमी मानता तुम्ही?
कमी कशाने? उलट हे फार जास्त होतंय असं वाटतं कधीकधी मला.
बस्का? परदुःख शीतल होतं म्हणतात, तसं का?
तेवढंच नाही; पण हे जात, धर्म, पंथ हे आपण फारच लावून धरतोय. मला सांगा, मुलगी जाणती आहे?
हो हो. सज्ञान आहे, शिकलेली आहे, कमावती आहे.
तिने निवडलेला बाप्या?
तो तर परदेशातलं पण शिक्षण घेऊन आलाय म्हणतात. चांगलं करिअरवाला आहे.
मग अजून पाहिजेच काय तुम्हाला?
तरी धर्म सोडायचा हे नाही पटत.
एरवी आपण इंग्लंड, अमेरिकेतल्या लोकांसारखं वागायला जातो. मग इथेच आपला बाणा का असावा?
हे काय काढलंत मध्येच? तिथे तर काळं, गोरं, आपल्या वर्णाचं, परकं, असं किती स्तोम असतं. निग्रो माणसाशी लग्न करणार्‍याचा सत्कार वगैरे करतात का तिथे?
बहुधा दुर्लक्ष करत असावेत. त्यात आता तर बोलायलाच नको. थेट इंग्लंडचा पंतप्रधान म्हणून एखादा बाहेरचा माणूस बसवायची तयारी सुरू झालीये तिथे.
काय सांगता? टेन डाऊनिंग स्ट्रीट या पत्त्यावर ब्रिटिश नसलेला माणूस राहणार? छे, छे! शक्यच नाही. बघवणार नाही, पटणारच नाही कोणाला.
पटवून घेतलेलं दिसतंय त्यांनी. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीत तब्बल पन्नास टक्के उमेदवार ब्रिटिशेतर आहेत. हिंदू आहेत, बौद्ध आहेत, कॅथॉलिक वंशातले आहेत, अल्पसंख्याकांपैकी आहेत. आता बोला.
अहो, इंग्रज तर पक्के कट्टर वंशवादी म्हणून कुख्यात ना? आपल्यावर तर किती अन्याय केले त्यांनी?
केले, पण आता ते काळाबरोबर बदलताहेत, सुधारताहेत. कोणीही यावर वाईट बोललेलं नाहीये अजून.
ती उमेदवार मंडळी गुणी वाटत असतील.
बरोब्बर! म्हणजे महत्त्व कशाला द्यायचं? रंगाला की कर्तृत्वाला? असा विचार होतोय ना? तोही थेट आपल्या जुन्या मायबापाकडून?
नाईलाज असेल म्हणायचा अन् काय?
नुसता नाईलाज नाही, शहाणपणही आहे, व्यवहाराचं! अहो, आता सगळं जग एक झालंय म्हटल्यावर कोण आपला आणि कोण परका?
तरी परधर्मात लग्न? आपल्याकडे काय चांगली मुलं मिळाली नसती बयेला? काही परंपरा, खानदानीपणा आहे का नाही?
भले, भेदाभेद अमंगळ, असं संतांनीसुद्धा म्हणून ठेवलंय जुन्या काळात. तेव्हा हा गोंधळ आवरा म्हणावं. जातधर्मपंथ यापेक्षा कर्तबगारीची कास धरा, यातच भलं आहे सर्वांचं!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT