संपादकीय

पवारांचा नवा डाव!

दिनेश चोरगे

एका दगडात अनेक पक्षी टिपण्यात पारंगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याच कौशल्याने अखेर भाकरी फिरवताना अनेकांना राजकीय धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसची भविष्यातील सूत्रे कुणाकडे जाणार, याची चर्चा गेल्या दहा-बारा वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू होती. सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड जाहीर करून पवारांनी आपला राजकीय वारसदार कोण असेल यावर शिक्कामोर्तब केले. सुप्रिया सुळे यांच्या जोडीला प्रफुल्ल पटेल यांच्याकडेही राष्ट्रीय कार्याध्यक्षपद विभागून देताना आपण घराणेशाहीला प्रोत्साहन देत नसल्याचा देखावा पवार यांनी केला खरा; पण तो केवळ देखावाच आहे, हे न समजण्याइतकी महाराष्ट्रातील जनता दूधखुळी नाही. यानंतर जेव्हा पवार पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतील तेव्हा साहजिकच अध्यक्षपदावर दोघांना बढती मिळणार नाही, त्यावेळी एकाच व्यक्तीची अध्यक्षपदी निवड होईल आणि ती सुप्रिया सुळे यांची असेल, हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही. खरे तर दोन मे रोजी आपल्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभावेळी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा करून पवारांनी धक्कातंत्राचा अवलंब केला होता. त्याचवेळीच पवारांना नवा निर्णय घ्यावयाचा असावा. परंतु, पक्षांतर्गत राजकारणातून जो विरोध उभा केला त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली; अन्यथा त्याचवेळी सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदी निवड झाली असती आणि कदाचित प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदासह काही राज्यांची जबाबदारी सोपवली गेली असती. अनपेक्षितपणे त्यावेळचा खेळ बिघडल्यामुळे नियोजनाप्रमाणे काही गोष्टी घडू शकल्या नसल्या, तरी एक पाऊल मागे घेऊन दोन पावले पुढे जाताना चारजणांना बाजूला कसे करायचे, हे पवारांसारख्या अनुभवी नेत्याला चांगलेच ठाऊक असावे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंचविसाव्या वर्षात पदार्पण करताना त्यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नव्या जबाबदार्‍यांची घोषणा केली. ही नावे पक्षाच्या व्यापक समितीनेच सुचवली असल्याचे सांगून पक्षांतर्गत लोकशाहीचाही देखावा उभा केला. परंतु, शरद पवार यांचे राजकारण जवळून पाहणार्‍या लोकांना, हे कसे काय घडू शकते याची पुरेपूर कल्पना असू शकते. त्यातही पुन्हा पवारांनी साधलेले टायमिंग महत्त्वाचे आहे. पक्षाच्या वर्धापनदिनी घोषणा झाल्यामुळे त्यासंदर्भात कुणाला आक्षेप घेण्याचेही कारण उरत नाही. शिवाय, देशाच्या राजकारणात मामुली ताकद असलेल्या पक्षाला वर्धापनदिनी मोठी प्रसिद्धीही मिळाली. नाही तर राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी फारशी दखल घेण्याचे कारणही उरले नसते. शरद पवार यांचे राजकारण समजून घेताना केवळ वर्तमानातील घटनांच्या मर्यादेत अन्वयार्थ लावला, तर काही गफलत होण्याची शक्यता असते. नीट आकलनासाठी त्यांचा भूतकाळही विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते.

गेल्या काही महिन्यांपासून भाकरी फिरवण्याची भाषा शरद पवार करीत होते, त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून करण्याचा प्रयत्न केला होता, तो यशस्वी न झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात त्यांनी कार्यकारी अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. यापुढील टप्पा स्वाभाविकपणे महाराष्ट्रातील संघटनात्मक बदलांचा असू शकतो आणि तिथे पवार काय धक्कातंत्र वापरतात हे पाहावे लागेल. तिसरा टप्पा अर्थातच राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीला उभे करण्याचा असू शकतो. जेणेकरून दुसर्‍या तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना वर सरकण्याची संधी मिळू शकेल. अर्थात, प्रस्थापित नेत्यांना त्यासाठी तयार करण्यात कितपत यश मिळते, हेही पाहावे लागणार आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना सर्वांचे लक्ष एकाच व्यक्तिभोवती केंद्रित झाले होते, ते म्हणजे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार. सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रीय जबाबदारी दिल्यानंतर अजित पवार यांना दुय्यम भूमिका स्वीकारावी लागणार. सध्याच्या फेरबदलानंतर अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदासह अनेक जबाबदार्‍या असल्याची सारवासारव केली जात असली, तरी त्यांची नाराजी लपून राहू शकलेली नाही. मधल्या काळात अजित पवार यांच्या ज्या हालचाली सुरू होत्या, त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता होतीच. शिवाय, पक्ष दोन गटांमध्ये आणि विचारधारांमध्ये विभागला असल्याचे ठळकपणे समोर येत होते. आजही तीच परिस्थिती आहे. पक्षाची सूत्रे सुप्रिया सुळे यांच्याकडे की अजित पवार यांच्याकडे जाणार, यावरून पक्षात आधीपासूनच गटबाजी आहे. ती कशी आकार घेते याची आता उत्सुकता असेल. कारण, सुप्रिया सुळे यांच्याकडील नव्या जबाबदार्‍यांमध्ये निवडणुकीची मुख्य जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. तिथे आपापल्या समर्थकांना उमेदवारी देताना मतभेद ठळकपणे चव्हाट्यावर येऊ शकतात.

मधल्या काळात अजित पवारांची भाजपसोबत जाण्यासाठीची लगबग लपून राहिली नव्हती आणि त्यांच्या हालचाली पसंत नसल्याने शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, केवळ नाराजी व्यक्त करून अजित पवारांना रोखता येणार नसल्याचे त्यांच्या लक्षात येत होते. पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे नाटक करून थोरल्या पवारांनी अजित पवारांच्या नाटकावर तात्पुरता का होईना पडदा टाकला होता. आता पुन्हा नव्या घोषणा करताना त्यांना कोरडेच ठेवले आहे. अशा रीतीने पक्षांतर्गत राजकारणात अजित पवार यांचे महत्त्व टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे काय, अशीही शंका उपस्थित झाल्यावाचून राहत नाही. अर्थात, अशा रीतीने खच्चीकरण होत असेल, तर कुणीही स्वाभिमानी नेता ते जास्त काळ सहन करू शकत नाही. सुप्रिया सुळे यांनी पक्षावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्यामध्ये अजित पवार यांचाच अडसर ठरू शकतो. त्यामुळे हळूहळू निष्प्रभ करून अजित पवार यांना बाहेर पडण्यास प्रवृत्त करण्याचा पवारांचा हा प्रयत्न असू शकतो, असेही मानले जाते. अर्थात, पवारांना नेमके काय साध्य करायचे आहे, हे फक्त तेच जाणू शकतात!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT