संपादकीय

नैसर्गिक संकटांच्या झळा

मोहन कारंडे

विविधतेने नटलेला भारत वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीमुळे एकाच काळात वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करीत असतो. संबंधित राज्यांच्या यंत्रणा परिस्थितीचा मुकाबला करीत असल्या, तरी गंभीर परिस्थितीमध्ये केंद्रीय यंत्रणांवरील ताणही वाढत असतो. महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीरपणे उभा ठाकला असताना दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजस्थानमध्ये तसेच ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये महापुराने हाहाकार माजवला आहे. ईशान्येकडील मणिपूर गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ हिंसाचाराने धगधगत असताना याच प्रदेशातील आसाम, मेघालय आणि सिक्कीम महापुराच्या संकटाशी झुंजत आहेत. आसाममध्ये गोलपाडा, कामरूप, बोको आणि परिसराला पुराचा फटका बसला, तर मेघालयात तुरा आणि गारो हिल्स क्षेत्रातील सात जिल्हे महापुरामुळे बाधित झाले. मोठा पाऊस झाल्यामुळे ईशान्येतील नद्यांना उधाण आले आहे. आसामचे चौदा जिल्हे महापुराच्या मगरमिठीत सापडले असून, सुमारे चाळीस हजार लोक त्यामुळे बाधित झाले आहेत. इथल्या तीन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, त्यामुळे आजूबाजूच्या आणखी काही गावांना धोका निर्माण झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे भारतीय जनता पक्षाचे ईशान्येतील तारणहार म्हणून ओळखले जातात. मणिपूरमधील संघर्षावर तोडगा काढून शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. आता आसाममधील पूरसंकट गंभीर बनले असताना ते मणिपूरच्या संकटाकडे कसे लक्ष देणार, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. मेघालयात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. त्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे. आसाम आणि त्रिपुराकडे जाणार्‍या रस्त्यांवर अडथळे निर्माण झाले आहेत. सिक्कीममध्ये तर याहून अधिक भीषण परिस्थिती आहे. तीन दिवसांपूर्वी भूस्खलनामुळे तीन हजार पर्यटक अडकून पडले होते, त्यांची सुटका करण्यासाठी प्रशासनाला मोठी यातायात करावी लागली. आसाम आणि मेघालयामधील महापुरात अनेक लोकांचे मृत्यू झाले. महापुराच्या पहिल्या टप्प्यात 'एनडीआरएफ'ला बचावकार्यावर भर द्यावा लागला होता. आठवडाभराच्या बचाव कार्यानंतर आता यंत्रणांनी मदत कार्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आता बाधित झालेल्या, स्थलांतरित केलेल्या लोकांना मदत पोहोचवणे गरजेचे आहे. दरवर्षी ईशान्य भारताला महापुराचा तडाखा बसतो आणि हजारो लोक विस्थापित होत असतात. पश्चिम महाराष्ट्रालाही अलीकडच्या काळात सातत्याने महापुराचा सामना करावा लागतो त्यामुळे ईशान्येतील लोकांच्या यातनांची कल्पना येऊ शकते. तरीसुद्धा ईशान्येतील महापुराची तीव्रता अधिक असते आणि कालावधीही जास्त असतो. स्थानिक प्रशासनाबरोबरच केंद्रीय यंत्रणांनाही त्यात दीर्घकाळ शक्ती खर्च करावी लागते. जीवितहानीही मोठी होत असते. 'एनडीआरएफ'ने दिलेल्या माहितीनुसार यंदा आसाममध्ये 39 आणि मेघालयामध्ये 46 लोकांचे बळी गेले, यावरून परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात यावे.

ईशान्य भारत अनेक संकटांशी झुंजत असताना दुसरीकडे बिपरजॉय वादळाने आधी गुजरात आणि पाठोपाठ राजस्थानला तडाखा दिला. गुजरातमध्ये किनारपट्टीवरील अनेक गावांना तडाखे देत, शेकडो हेक्टरवरील शेतीचे नुकसान करीत वादळ राजस्थानकडे सरकले आणि हाहाकार माजवला. वादळ आणि वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जालोर जिल्ह्यातीलर सांचोरमध्ये बंधारा फुटल्यामुळे अनेक भाग पाण्याखाली बुडाले. नर्मदा लिफ्ट कॅनॉलमध्ये पाणी वाढले आणि परिणामी कालवाही फुटला. संकटांच्या अशा या मालिकेमुळे तेथील जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहेच, शिवाय प्रशासनापुढेही मोठे आव्हान उभे राहिले. अजमेरमध्ये इस्पितळांच्या वॉर्डांसह अतिदक्षता विभागातही पाणी शिरले. जैसलमेर, बिकानेरसह राजस्थानच्या विविध भागांना पावसाने झोडपून काढले. बिपरजॉय वादळानंतर राजस्थानमधील परिस्थिती बिकट बनली असून, काही ठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची वेळ आली. पालीसह जालोर, सिरोही आणि बाडमेर जिल्ह्यांनाही चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले. दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच सोशल मीडियामुळे देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही घडणार्‍या घडामोडी थेट घरात बसून कळण्याचे सध्याचे दिवस आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्‍यात महापूर, वादळाने माजवलेला हाहाकार याचे चित्रण थरकाप उडवणारे आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात अजून पावसाची प्रतीक्षा आहे. वळवाचा पाऊस नेहमी पडत असतो, त्याचा पेरणीसाठी, पाण्यासाठी उपयोग होत असतो. परंतु, यंदा काही अपवाद वगळता वळवानेही पाठ फिरवल्यामुळे केवळ उन्हाळा आणि उन्हाळ्याच्या तीव्रतेने अनुभवावा लागला. धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीटंचाईची तीव्रता वाढली, हा भाग पुन्हा वेगळा. एकीकडे कडक उन्हाळ्याची परिस्थिती अनुभवत असताना, टीव्हीवर मात्र महापूर आणि वादळाने केलेला कहर पाहण्यास मिळावा, या विरोधाभासाचे आकलनही अनेकांना होत नाही. तीन ऋतू आणि त्यांचा कालावधी साधारण सारखाच असताना अशी विरोधाभासाची परिस्थिती कशी काय, असा प्रश्न अनेकांना पडल्यावाचून राहत नाही. नैसर्गिक संकटे आपल्याला नवीन नाहीत, ती सातत्याने येतच असतात. परंतु, त्यांच्या कारणांचा मुळाशी जाऊन शोध घेतला, तर मानवी दुर्व्यवहाराशी संबंधित गोष्टीच आढळून येतील. आपल्या स्वार्थासाठी निसर्गावर अतिक्रमण करून माणसाने अनेक गोष्टी पदरात पाडून घेतल्या. त्यामुळे निर्माण झालेल्या असमतोलाचा फटका विविध पद्धतीने बसत असतो. जागतिक पातळीवर त्यालाच हवामान बदल, असे म्हटले जाते. हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस तीव्र बनत चालले असून, त्यासाठी मानवी व्यवहार कारणीभूत असल्याचे जगभरातील शास्त्रज्ञांनी वारंवार मांडले आहे. तरीसुद्धा कोणत्याही पातळीवर त्याची दखल घेऊन सुधारणा केली जात नाही. विकास हवाच आहे, परंतु तो करताना निसर्गाचे किती नुकसान करावयाचे याचेही भान ठेवायला हवे. ते जोपर्यंत ठेवले जाणार नाही, तोपर्यंत निसर्गाचे असे फटके बसतच राहणार आहेत. त्यापासून कुणालाही लांब राहता येणार नाही.

SCROLL FOR NEXT